अहमदनगर

मी राजीनामा देतो अन् तुम्हींबी द्या..होऊ द्या निवडणूक : आमदार राम शिंदे

अमृता चौगुले

खेड : पुढारी वृत्तसेवा :  'लोकांच्या मनात काय चाललंय? मी रोज बघतोय, ऐकतोय. लोकांची मनं जिंकण्यासाठी खूप मोठं मन लागतं.आमदारांच्या निवडणुकीत 30 आमदारांनी मला मते दिलीत अन् सर्वाधिक मतांनी निवडून आलो. मग याला काय मागचं दार म्हणतात का? असा टोला रोहित पवारांचे नाव न घेता आमदार राम शिंदे यांनी लगावला. ते म्हणाले आता लोकं विचार करतात की, 2024 ला निवडणूक झाल्यावर काय होईल? माझं, तर म्हणणं आहे आत्ताच निवडणूक होऊ द्या, मी राजीनामा देतो अन् तुम्हीही राजीनामा द्या, असे खुले आव्हान त्यांनी आमदार पवारांना दिले.

निमित्त होते गणेशवाडी (ता.कर्जत) येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचे. आमदार रोहित पवारांनी केलेल्या 'मागच्या दाराच्या' टीकेला त्यांनी उत्तर दिले. आमदार शिंदे म्हणाले, 'विधानसभेत पाणंद रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाला आणि पुन्हा सर्वजण कामाला लागले. आपल्या कामाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे अडीच वर्षांत कुठलीही चौकशी लागली नाही. महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे काम करण्याचे भाग्य मला मिळाले. भाषणात बोलायचं वेगळं, करायचं वेगळं, फेसबुकला टाकायचं वेगळं, व्हॉटस् अ‍ॅपला वेगळं, माणसाला गंडवायचं वेगळंच, असा धंदा आपण केला नाही. त्यामुळे आपल्या मागे ईडी लागत नाही, ना सीबीआय लागत नाही,' अशी कोपरखळी रोहित पवारांचे नाव न घेता त्यांनी मारली.

यावेळी गणेशवाडीच्या ग्रामस्थांनी त्यांचा विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल सत्कार केला. सत्तेत असताना राम शिंदे यांनी भरीव निधी दिला आहे. आता यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष सुनील गावडे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे, तात्यासाहेब माने, गणेश पालवे, करमनवाडीचे सरपंच भरत पावणे, विलास कायगुडे, संजय कायगुडे, कल्याण दातीर, नवनाथ पाडुळे, शरद पावणे, नानासाहेब दुरगुडे, संतोष श्रीराम, सुभाष ठोंबरे, संतोष पाडुळे, रामभाऊ कायगुडे, सुभाष करे, बाबासाहेब कायगुडे, कल्याण कायगुडे, जिजाबापू पाडुळे आदी उपस्थित होते. गणेश मराळे यांनी प्रास्ताविक केले. बजरंग कायगुडे यांनी आभार मानले.

गद्दारांना थारा नाही याचेशिंदेेंकडून खंडन
'पक्ष बदलून गेलेल्यांना आता पुन्हा पक्षात थारा नाही,' अशी प्रसारमाध्यमांवर बातमी फिरत होती; मात्र 'मी तसे म्हणलोच,' नसल्याचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी सांगून याचे खंडन केले. वास्तविक सोडून गेलेल्या अनेक भाजप कार्यकर्त्यांचे पुन्हा भाजपमध्ये इनकमिंग होण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच आमदार शिंदे यांच्या भाषणातून दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT