अहमदनगर

भारतीय ऑलिम्पिक संघटना दिग्गजांच्या विळख्यातून बाहेर

Arun Patil

नगर, अल्ताफ कडकाले : भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर (आयओए) नेहमीच नेत्यांचे, त्यातच पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. 'आयओए'मध्ये राजकारण आणि गोंधळाचे वृत्त नेहमीच चर्चेचा विषय राहिले. नुकतेच अध्यक्ष नरेंद्र बत्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता यांच्यातील वादही चांगलाच चर्चेत राहिला; परंतु यावेळच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या म्हणजेच 'आयओए'च्या निवडणुकीत मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळाले. राजकीय पक्ष व दिग्गज नेते यापासून दूर राहिल्याचे धक्कादायक चित्र दिसले. यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठरली.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला, तीही आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजेच उडाणपरी पी.टी. उषा (पिलवुल्लकंडी थेक्केपारंबिल उषा) यांची 'आयओए'च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यामुळे या निवडणुकीत इतिहास रचला गेला आहे. म्हणजेच दिग्गजांच्या हातून ही संघटना निसटली असून, नकळत 'साई'च्या हातात गेली आहे. आता, 'आयओए'मधून अंतर्गत राजकारण हद्दपार होऊन खेळाडू व अधिकृत खेळ संघटना मोकळा श्वास घेऊ शकतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक डिसेंबर 2021 मध्ये होणार होती. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयातील याचिकेमुळे ही निवडणूक प्रलंबित होती. भारत सरकारने जारी केलेल्या क्रीडा संहितेनुसार भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेत बदल करण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला स्पष्ट सांगितले होते की, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेत 15 डिसेंबर 2022 पर्यंत बदल करून निवडणुका झाल्या नाहीत, तर 'आयओए' बरखास्त करण्यात येईल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मधील 'आयओसी'चे अधिवेशनही भारतातून हलविण्यात येईल.

सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपाने सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे 'आयओए'च्या नियमांमध्ये बदल करून 10 डिसेंबरला निवडणूक घेण्यात आली. यात 33 क्रीडा संघटनांचे 66 सदस्यांनी मतदान केले. या निवडणुकीत प्रत्येक फेडरेशनमधील एक पुरुष आणि एक महिला सदस्यांनी मतदान केले. नीता अंबानी या 'आयओसी' सदस्य असल्याने त्यांनीही या निवडणुकीत मतदान केले. याशिवाय अ‍ॅथलिट कमिशनच्या दोन सदस्यांव्यतिरिक्त (एक पुरुष आणि एक महिला), आठ उत्कृष्ट खेळाडूंनीही या निवडणुकीत सहभाग नोंदविला.

निवडणुकीतून सर्व दिग्गज राजकारणी बाहेर

आयओएच्या राजकारणात जास्तीत जास्त भारतीय खेळ महासंघ आपल्या बाजूने राहावेत व आयओएवर आपले निर्विवाद वर्चस्व राहावे, यासाठी अनेक माजी दिग्गज पदाधिकार्‍यांनी अनेक खेळ संघटनांमध्ये वाद निर्माण करून दोन गटांमध्ये खेळ विभागून ठेवले. त्यामुळे अनेक आलिम्पिक खेळांमध्येही आज दोन संघटना कार्यरत असून त्यांच्यातील वादामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व दिग्गज खेळाडूंनी आयओएची सूत्रे हाती घेतल्याने आता हे चित्र बदलेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

'आयओए'च्या घटनेमुळे सर्व महारथी निवडणूक शर्यतीतून बाहेर पडले होते आणि 10 डिसेंबरच्या निवडणुकीपूर्वी पी.टी. उषा यांची बिनविरोध निवड होणे ही एक ऐतिहासिक घटना आहे. भारतीय क्रीडाविश्वात चर्चेचा विषय बनली आहे. भारतीय इतिहासात या पदावर महिला कधीच अध्यक्ष झालेली नाही. परंतु, या पदावर महिला खेळाडूची निवड आणि सर्व दिग्गजांना निवडणूक प्रक्रियेतून वगळणे ही एक मोठी घटना होती.

SCROLL FOR NEXT