राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी तरुण विवाहितेचा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह घरात आढळून आला. पोलिस ठाण्यामध्ये तरुणीच्या माहेरील नातलगांनी एकच गर्दी करत सासरच्या लोकांनीच तिचा जीव घेतल्याचा आरोप करीत जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पावित्रा घेतला. त्यामुळे ब्राह्मणी परिसरात तणावात्मक परिस्थिती होती.
सारा उर्फ सोनी प्रसाद शिरसाठ (वय 26) असे या विवाहितेचे नाव आहे. मयत सोनी सासरच्या लोकांसमवेत ब्राह्म णी येथे राहत असताना अनेकदा वादाचे प्रसंग घडत होते. अनेकदा तडजोड होऊन तिला नांदण्यासाठी पाठविण्यात आल्याची चर्चा होत होती. दरम्यान, सोनी शिरसाठ हिचा मृतदेह सांयकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदनासाठी आणून ठेवण्यात आला होता.
दरम्यान, मृत विवाहित तरुणीचे वडील सुरेश सुखदेव संसारे (वय 51) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, पती प्रसाद पावलस शिरसाठ, सासू लता शिरसाठ, सासरे पावलस वामन शिरसाठ, दीर प्रतीक शिरसाठ, पंकज शिरसाठ (सर्व रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) व नणंद पल्लवी शिरसाठ (रा. खोकर, ता. श्रीरामपूर) यांनी सोनी हिचा वेळोवेळी मानसिक छळ केला.
2019 मध्ये कोर्टामार्फत नांदण्यास येऊनही त्रास सुरूच होता. माहेरून ट्रॅक्टर घेण्यासाठी 5 लाख रुपये आण, असे सांगत त्रास देत होते. सासरे पावलस शिरसाठ हा वाईट नजरेने पाहत होता. अखेरीस सासरच्या मंडळीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.