श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा: बेलवंडी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो फरार होता. संदेश उर्फ दौल्या संजय भोसले (वय 24, रा.कोळगाव, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. दरोडा, घरफोडी करणारा सराईत आरोपी संदेश उर्फ दौल्या संजय भोसले हा कोळगाव शिवारात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना कोळगाव येथे कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकातील अधिकारी व कर्मचार्यांंनी पहाटेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबवून संदेश उर्फ दौल्या संजय भोसले यास ताब्यात घेतले.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, तो दीड-दोन वर्षांपासून वेशांतर करून पोलिसांना चकवा देत होता. कोळगाव शिवारात त्याला चोरी करताना रंगेहाथ पकडून ग्रामस्थांनी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बेलवंडी पोलिस या आरोपीला घेऊन पोलिस ठाण्यात जात असताना, या आरोपीने चालत्या गाडीतून उडी घेत पलायन केले होते. तेव्हापासून तो फरार होता. त्याच्याविरुद्ध सुपा, बेलवंडी, श्रीगोंदा, चांदवड (नाशिक) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.