पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या मुंबईतील बैठकीत 16 मागण्यांपैकी 9 मागण्या मान्य झाल्या. दरम्यान, यावर एक महिन्याच्याआत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने किसान क्रांतीच्या वतीने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे आज झालेल्या ग्रामसभेत जाहीर केले. दरम्यान, उर्वरित मागण्यांसाठी राज्य सरकारच्या मदतीने केंद्राकडे पाठपुरावा करून राज्यातील खासदारांना भेटण्याचे ठरविण्यात आले.
1 जूनपासून किसान क्रांतीच्या वतीने धरणे आंदोलनाला सुरुवात झाली होती. तिसर्या दिवशी राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन कृषी मंत्री दादा भुसे यांना दूत म्हणून पाठवले होते. यांनी शेतकर्यांशी चर्चा करून मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे जाहीर केले होते. यानंतर दोन दिवस आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
7 जून रोजी मुंबईत झालेल्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित बैठकीत किसान क्रांतीच्या मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेचा तपशील ग्रामसभेत ठेवून आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार होता. यानुसार गुरुवारी विशेष ग्रामसभा घेवून मुंबईतील बैठकीची माहिती देत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला.
यावेळी किसान क्रांतीच्या वतीने मुंबईतील बैठकीचा तपशील ग्रामसभेत मांडला. 16 पैकी 9 मागण्या राज्य सरकारने मान्य करून त्यावर एक महिन्यात कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला.
या चर्चेत सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, सुभाष कुलकर्णी, बाळासाहेब चव्हाण, मुरलीधर थोरात, सुभाष वहाडणे, अनिल नळे, दत्ता धनवटे यांनी ग्रामसभेपुढे माहिती मांडली. यावेळी हात वर करुन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर झाला.
आंदोलकांकडून दैनिक 'पुढारी' ला धन्यवाद..!
शेतकर्यांच्या प्रश्नावर 1 जुन पासून सुरू केलेल्या थरणे आंदोलनास दै. 'पुढारी' ने चांगली प्रसिद्धी दिली. यामुळे हे आंदोलन राज्यात पोहचवून राज्य सरकारने तातडीने दखल घेतली. याबद्दल आज झालेल्या ग्रामसभेत दै. 'पुढारी' चे कौतुक करून धन्यवाद दिले.
सटाणा तालुक्यातून समर्थन!
या ग्रामसभेला (मुंजवाड, ता. सटाणा, जि. नाशिक) येथील शेतकर्यांनी सहभाग घेऊन किसान क्रांतीच्या भूमिकेशी समर्थन केले. या अगोदर या शेतकर्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.