अहमदनगर

नेवासा : रस्त्यांचे पावसाळ्यात तीन-तेरा, पाण्यातून मार्ग काढताना वाहनांचा जीवघेणा प्रवास

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : कुकाणा परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. चिलेखनवाडी व कौठा परिसरात रस्ता असून, नसल्यासारखा झाला आहे. कुकाणा परिसरातील रस्त्यांचे पावसाळ्यात तीन-तेरा वाजले आहेत. चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत व बजरंग पुरी यांनी रस्ता दुरावस्थे विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. कुकाणा ते शेवगाव मार्ग चिलेखनवाडी शिवारात नेवासा हद्दीपर्यंत पूर्णपणे उखडलेला असून, गुरुवारी रात्रीच्या पावसाने तर जागोजागी या मार्गावर डबक्यांची साखळी तयार झालेली दिसते.

या खडड्यांतील पाण्यातून मार्ग काढताना वाहनांचा जीवघेणा प्रवास करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाकपणामुळे प्रवासी व नागरिकांचे हाल सुरूच आहेत. कुकाणा ते चिलेखनवाडी, पुढे भायगावपर्यंत नेवासा तालुक्याची हद्द आहे. कुकाणा ते भायगाव हा मार्ग अस्थित्वहिन झाला आहे. रस्त्यांवरचे आडवे- तिडवे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. 15 दिवसांपूर्वीच चिलेखनवाडीत खड्ड्यात दुचाकीवरून पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. चिलेखनवाडी ते कुकाणा अंतर अवघे तीन किमीचे; पण 15 मिनिटातही ते पार करता येत नाही. कुकाणा बस थांब्यापासून ते चिलेखनवाडीपर्यंत रस्त्यावर डांबराचा थर निघुन खड्डे पडले आहेत.

पुढे सावंत, दुकळे वस्तीपर्यंत रस्ता खचून गटारे झाली आहेत. हा मार्ग नेवासा-शेवगाव मार्ग असून महत्वाच्या मार्गाची ही दुरावस्था आहे. अशीच परिस्थिती कुकाणा ते घोडगाव मार्गावर कौठा गावापर्यंतची आहे. कुकाण्यापासून देवगाव व पुढे शहापूर फाटा, फत्तेपूर व कोेैठा हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. कुकाणा परिसराला हा मार्ग नगरचा आहे. पण, दुरावस्थेमुळे कुकाणा ते नेवासा फाट मार्गे नगरला जावे लागते. यामुळे 20किलोमीटचा अधिक प्रवास करावा लागतो. यामुळे आर्थिक बोजाही वाढतो. कुकाणा ते दहिगाव रस्ताही खड्डेमय झाला आहे. कुकाणा परिसरातील रस्ते आता मृत्यूचे सापळे बनले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT