अहमदनगर

नेवासा तहसीलमध्ये तब्बल 16 लाखांचा घोटाळा

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तहसीलमधील कोतवालाने नैसर्गिक आपत्ती अनुदान खात्यात फेरफार करुन तब्बल 16 लाखांवर डल्ला मारल्याचे उघडकीस आल्याने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाल अविनाश हिवाळे (रा. देडगाव, ता. नेवासा) मात्र पसार झाला आहे.

याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीसाठी शासन तहसीलदारांमार्फत मदत अनुदान देत असते. या निधीचे तालुकास्तरावर राष्ट्रीयकृत बँकेत खाते असून या खात्यावरुनच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाते. लाभार्थ्यांच्या नावावर काही हजारांत आलेल्या अनुदानाची रक्कम खाडाखोड करुन काही लाखांत करण्याची व ती आपल्या ओळखीच्या लोकांच्या खात्यात वर्ग करण्याची किमया या कोतवालाने केल्याचे उघडकीस आले.

या खात्याचे काम पाहणार्‍या एका अधिकार्‍याने सहज या खात्याचे अवलोकन केले असता, ठराविक लोकांना लाखो रुपये अनुदानापोटी वितरित केल्याचे दिसून आले. या खात्यातून काही हजारांच्या पलिकडे शासनाने कधीही अनुदान दिलेले नसल्याचा अनुभव असल्याने त्यांनी खोलात शिरुन शासनाकडून मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या तपासल्या. त्यात त्यांना मोठी तफावत आढळून आली. मूळ लाभार्थी व त्यांच्या रकमा, तसेच प्रत्यक्षात अनुदान दिलेले लाभार्थी व त्यांना वितरित केलेल्या रकमा यांत मोठी तफावत आढळून आल्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन या खात्याची सविस्तर माहिती घेतली.

तेव्हा असे बरेच प्रकार घडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बँक स्टेटमेंट तसेच महसूल दप्तरी असलेली कागदपत्रे तपासून पाहता ती जुळत नसल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी या सर्व कागदपत्रांसह तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार उजेडात आला. सुराणा यांनी शनिवारी (दि.25) दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने तालुक्यात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतपिकांचे नुकसानभरपाई दिली जाते. पंचनामे झाल्यानंतर संबंधित गावातील तलाठी, कोतवालांकडे मदतीचे धनादेश देण्यात येतात.

असेच काही धनादेश डिसेंबर 2019 ते आजपर्यंत महसुल कर्मचारी राजेंद्र दगडू वाघमारे, तुकाराम एल. तांबे, मनोहर डोळस, धीरज साळवे यांच्या कालावधीत तालुक्यातील देडगाव येथील कोतवाल अविनाश हिवाळे याच्याकडे संबंधितांना देण्यात आले होते. परंतु हिवाळे याने स्वत:च्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नुकसानग्रस्त लाभार्थी शेतकर्‍यांना वितरित धनादेशाचे वाटप न करता धनादेशांमध्ये बँकेच्या नावात खाडाखोड करून रक्कमेत वाढ करून तसेच तहसीलदार नावाचा बनावट शिक्क्याचा वापर केला. बनावट व खोट्या सह्या करून 9 धनादेशांमध्ये फेरफार करून 16 लाख 14 हजार 784 रुपयांचा अपहार करून शासनाचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नेवासा पोलिसांनी विविध कलमान्वये कोतवाल अविनाश हिवाळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस निरीक्षक विजय करे पुढील तपास करीत आहेत.

गुन्हा दाखल करण्यास चालढकल
16 लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली आठवड्यापासून सुरू होत्या. दरम्यानच्या काळात संबंधितांकडून 89,103 रुपये वसुली करण्यात आले. हा प्रकार झाल्याची कुणकुण महसूल विभागात सुरूच होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात चालढकल होत असल्याची चर्चा होती.

अशा वाढविल्या धनादेशावरील रकमा
धनादेश क्रमांक – 070913, दि. 11/2020, रक्कम-800 ऐवजी 1,65, 800. धनादेश क्र.-070916 दि. 11/3/2020 रक्कम-1600 ऐवजी 2,97, 452. धनादेश – क्र. 070917, दि. 11/3/2020, रक्कम- 65,720 ही प्रविण बागडे 50,000 व दयानंद जाधव 15,720. धनादेश क्र. 070918, दि. 11/3/2020, रक्कम-1200 ऐवजी 1,95,712. धनादेश क्र. 070919, दि.11/3/2020, रक्कम-26700 ऐवजी अतुल अविनाश हिवाळे 26700. धनादेश क्र. 070898, दि. 11/3/2020 रक्कम- 800 ऐवजी 1,95,725. धनादेश क्र. 69039, दि. 21/12/2019, रक्कम-3600 ऐवजी 2,25,751. धनादेश क्र. 69040, दि. 21/12/2019, रक्कम-6000 ऐवजी 2,17,412. धनादेश क्र. 69041 दि.21/12/2019, रक्कम-2400 ऐवजी 2,24,512.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT