रमेश चौधरी:
शेवगाव : तालुक्यातील 71 सोसायटी निवडणुकांपैकी 35 संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. 36 सोसायट्यांमध्ये मतदान झाले. निवडणुका झालेल्या एकूण संस्थांचा सुमारे 45 ते 50 लाख रुपये खर्च झाला असून, हे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील एकूण 73 सहकारी सोसायट्या आहेत. 71 सोसायट्या निवडणुकीस पात्र होत्या. या निवडणुकांच्या माध्यमातून गावागावात राजकारण ढवळून निघाले. जिरवा-जिरवी आणि श्रेष्ठींसमोर आपली श्रेष्ठता दाखविण्यासाठी आपलीच संस्था खर्चात जात असल्याचा काही गावांत विसर पडला. मतदानासाठी संस्थांना भुर्दंड बसला.
तर काही गावांतील सुजाण सभासदांनी संस्थेच्या खर्चाचा सारासार विचार करता तडजोड करुन निवडणुका बिनविरोध करण्याचे मोठेपण दाखविले. तालुक्यातील 71 सोसायट्यांपैकी बक्तरपूर, थाटे, ठाकूर पिंपळगाव, ढोरजळगाव, शेवगाव, अंतरवाली खुर्द, लखमापुरी, वरखेड, विजयपूर, मुंगी नं.2, बेलगाव, खानापूर, नजिक बाभुळगाव, खामपिंप्री, मजलेशहर, दहिगाव ने,खामगाव, कर्हेटाकळी, गा. जळगाव, चेडेचांदगाव, भायगाव, चापडगाव, वडुले बुद्रुक, अंतरवाली बुद्रुक, आखतवाडे, नागलवाडी, कुरुडगाव, वाडगाव, फलकेवाडी, सामनगाव, शिंगोरी, तळणी, गदेवाडी, अधोडी, गोळेगाव या 35 सोसायट्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत .
राणेगाव, ठाकूर निमगाव, ढोरजळगाव ने मलकापूर, सोनेसागंवी, सोनविहिर, कांबी, कोळगाव, देवटाकळी, एरंडगाव, जोहरापूर, खडके मडके, हिंगनगाव ने, वाघोली, भातकुडगाव, बालमटाकळी, मंगरूळ, खरडगाव, मळेगाव, बोधेगाव, वरुर बुद्रुक, शेकटे बुद्रुक, निंबेनांदूर, लाडजळगाव, घोटण, सालवडगाव, अमरापूर, आव्हाणे बुद्रुक, सुलतानपूर, शहरटाकळी, हातगाव, ताजनापूर, दहिफळ, राक्षी, ढोरसडे, भा. निमगाव, पिंगेवाडी या 36 संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया राबवावी लागली.
यातील 67 सोसायट्यांच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या निवडी झाल्या. गोळेगाव, हातगाव, भाविनिमगाव, पिंगेवाडी या संस्थांच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात झाल्याने तेथील पदाधिकारी निवडी होणे बाकी आहे. स्थानिक सहकारी सोसायटी ही शेतकर्यांची कामधेनू आहे. या संस्था टिकवण्यासाठी मालकी हक्क असणारे शेतकरी सभासद विशेष प्रयत्न करतात. संस्थेला इतर आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी काही संस्थांना वेगवेगळे उद्योग जोडले आहेत.
हे सर्व ज्ञात असताना केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने अथवा जिरवा-जिरवीच्या राजकारणात या संस्थांच्या निवडणुका लादल्या जातात. यात त्यांना खर्चाचा भुर्दंड बसतो याचा विचार होणे आवश्यक आहे. हाच विचार व गाव एकोपा समोर ठेवून तालुक्यातील जवळपास निम्म्या संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मतदान प्रक्रिया झालेल्या इतर संस्थांचे जवळपास 40 ते 45 लाख रुपयांचा निवडणूक खर्चात चुराडा झाला असण्याची शक्यता आहे. हा सारासार विचार करता आता तरी 'उघडा डोळे' हाच पर्याय शेतकर्यांना उरला आहे.