प्रवीण ताटू
शिर्डी : सद्गुरु श्रीसाईबाबांच्या शिर्डीवर अस्मानी पर्जन्याचा जबर तडाखा बसला. यामध्ये चिंतातूर झालेल्या शिर्डीकरांच्या मदतीसाठी विखे पिता-पुत्र तत्काळ धावून आले. त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून, पाहणी करून, भरीव मदत मिळवून दिली, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी लोकसभेचे खा. सदाशिव लोखंडे मात्र शिर्डीकरांना जनतेला दिसेना, असे वास्तव समोर आल्याने अतिवृष्टीग्रस्त शिर्डीकर संताप व्यक्त करीत आहेत. खा. लोखंडे केवळ नावाचे खासदार झाले, तर ना. राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच कामाचे ठरत असल्याच्या चर्चा झडत आहे. शिर्डीला (दि. 30) ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रीगणेशाच्या आगमनाच्या दिवशी प्रचंड पावसाने झोडपले.
यातून शिर्डीच्या नागरिकांना प्रचंड पाण्याचा त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या चुली पाण्याने विझल्या, तर अनेकांच्या घरात पाण्याने आपला नवा खेळ मांडला. अगदी खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, ही बाब महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना कळाली. यावेळी तत्काळ खा. विखे पाटील शिर्डीत दाखल झाले. आपल्या कार्यकर्त्यांसमवेत दुचाकीवरून त्यांनी अतिवृष्टी भागाची पहाणी केली. आपत्तीग्रस्तांना आधार देण्याचे काम केले. ज्यांचा निवारा गेला, त्यांना तत्काळ निवारा व अन्न देण्याचे काम केले. यावेळी आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करीत ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा सोक्षमोक्ष लावण्याच्या त्यांनी प्रशासनास सूचना केल्या.
दरम्यान, पुत्र खा. सुजय विखे पाटील शिर्डी मतदारसंघात असून देखील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांसह आपत्तीग्रस्तांच्या भावना लक्षात घेवून, त्याच दिवशी तब्बल 258 कुटुंबांसाठी तत्काळ गहू-तांदळाची मदत पोहोच केली. ही मदत थेट आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोच करण्याची तत्काळ व्यवस्था करण्यास शिर्डी नगर परिषद प्रशासनास सांगितले अन् पाहता-पाहता प्रत्येक वंचितांपर्यंत ही मदत पोहोचलीसुद्धा! दुसरीकडे महसूल प्रशासनास तत्काळ पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे, तर लवकरच ज्या नागरिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम ना. विखे पाटील करणार आहेत.
दुसरीकडे ज्यांच्या लोकसभा मतदारसंघात शिर्डी शहर येते, ते लोकप्रतिनिधी खा. सदाशिव लोखंडे यांना या भागाची पाहणी करणे का गरजेचे वाटले नाही? ज्या मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले, त्यांच्याकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून का दुर्लक्ष केले, असे संतप्त सवाल आपत्तीत सापडलेले काही शिर्डीकर करीत आहेत. अतिवृष्टीने अनेकांचे संसार पाण्यात बुडाले. सर्व होत्याचे नव्हते झाल्याने शिर्डीकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
ना. आशुतोष काळेंने लक्ष द्यावे..!
अतिवृष्टीचे पाणी श्रीसाईबाबा संस्थानच्या रुग्णालयात शिरले. त्यामुळे श्रीसाई संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालून रुग्णसेवा पूर्ववत करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
विखे पिता-पुत्रास जनतेचा कळवळा..!
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राज्याची जबाबदारी असताना देखील त्यांनी मतदारसंघातील समस्या व अडचणींकडे जराही दुर्लक्ष केले नाही. दुसरीकडे खा. डॉ. सुजय विखे पाटील देखील केंद्रातून मदत मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ना. विखे पिता-पुत्र यांना जनसामान्यांचा किती कळवळा आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून दिसते. प्रत्यक्ष भेट व मदत देणे, तर सोडाच. मात्र, साधे आश्वासनसुद्धा खा. सदाशिव लोखंडे शिर्डीकरांना देऊ शकले नाहीत.