अहमदनगर

नवीन रचनेमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ, जनसंपर्काचा पुनः श्च श्रीगणेशा

अमृता चौगुले

अनेक प्रस्थापित नेत्यांची या नवीन रचनेमध्ये अडचण निर्माण झाल्याची प्राथमिक चित्र समोर आले आहे. यामुळे तालुक्यामध्ये आगामी काळात नवीन राजकीय समीकरणे निर्माण होतील. या नवीन रचनेमध्ये तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समितीच्या गणांच्या रचनेमध्ये आणि गावांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आला. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्या परिसरामध्ये लोकसंपर्क ठेवून असणार्‍या राजकीय प्रस्थापित नेत्यांची मोठी अडचण निर्माण होईल, असे दिसते.

या नवीन रचनेमध्ये अनेक गट -गणची मोडतोड करण्यात आली. काही जवळची गावे गटात, तर गणात जोडण्यात आली. यामुळे इच्छुकांमध्ये काही प्रमाणात नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येते. मतदारांना मात्र नवीन गट आणि गणात नेते जाण्याची संधी यामुळे निर्माण झाली. नवीन प्रारूप आराखडा प्रसिद्ध होताच कर्जत तालुक्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

गाव-पारावर, पानटपरीवर आणि कट्ट्यांवर या नवीन रचनेबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी, तर आता कोण विरुद्ध कोण उभा राहणार, याची समीकरणे जोडण्यास सुरुवात झाली आहे.

इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी

यापूर्वी जिल्हा परिषदेचे चार गट होते. त्यांची विभागणी पाच गटांत केल्याने मोठा उलटफेर झाल्याचे दिसून येते. प्रारूप आराखडा प्रसिद्ध होताच इच्छुकांची आकडेमोड सुरू झाली आहे. यापूर्वीच्या रचनेनुसार इच्छुकांनी त्या-त्या परिसरात मतदारांशी केलेला लोकसंपर्क व कार्यक्रमास लावलेल्या हजेरी, काही वेगळी समीकरण निर्माण केली होती. या सर्वांवर या नवीन रचनेमुळे पाणी फेरल्याचे दिसून येते.

राजकीय तुल्यबळ नेते एकाच गटात

नवीन रचनेमध्ये कर्जत तालुक्यातील प्रस्थापित नेते वेगवेगळ्या पक्षातील एकाच गटांमध्ये आल्यामुळे यावेळी अनेक तुल्यबळ लढत पाहण्यास मिळू शकेल, असेच प्राथमिक चित्र आहे. दुसरीकडे काही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस प्रत्येक गट-गणांमध्ये निर्माण होईल. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी हे देखील पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी ठरणार आहे.

कर्जत तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषद पाच गट असून, पंचायत समितीचे दहा गण आहेत. एकूण लोकसंख्या दोन लाख 17 हजार 636 असून, 116 गावांचा समावेश आहे. यापूर्वीची जिल्हा परिषदचे चार गट होते, तर पंचायत समितीचे आठ गण होते. जिल्हा परिषदेचा एक गट, तर पंचायत समितीचे दोन गणाची वाढ झाली आहे.

जिल्हा परिषद मिरजगाव गटात 20 गावे असून, चापडगाव गटात 29, कोरेगाव गटात 24 कुळधरण गटात 25 गावे, राशीन गटात मिरजगाव, निमगाव गांगर्डा, चापडगाव, टाकळी खंडेश्वरी, कोरेगाव, आळसुंदे, कुळधरण, बारडगाव सुद्रिक, राशीन, भांबोरा आदी गावे आहेत.

भौगोलिक चुका मोठ्या प्रमाणात

या गट- गण रचनेमध्ये कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भौगोलिक चुका झाल्याचे दिसून येते. यामध्ये मिरजगाव गटामध्ये त्यांना लगत असणारे गुरव पिंपरी गाव पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या चापडगाव गटामध्ये गेले, तर दुसरीकडे चापडगाव जिल्हा परिषद गटांमध्ये असणारे माही गाव दुसर्‍या गटामध्ये गेले. अशा पद्धतीने कर्जत तालुक्यातील कोरेगाव, कुळधरण व राशीन या सर्वच गटामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अडचण झालेल्या प्रस्थापीत नेत्यांचे कार्यकर्ते आणि काही मतदार याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये हरकती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

SCROLL FOR NEXT