अहमदनगर

नगर : सौर उर्जा निर्मितीतून शेतकरी वंचित का..? : आ.तनपुरे यांचा सवाल

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडी शासनाच्या काळामध्ये राज्य उर्जा मंत्री म्हणून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले. वीज समस्या सोडविताना वीज बील माफीच्या योजना आणल्या. अडचणीत सापडलेल्या महावितरण कंपनीची भरभराट होऊन कंपनीला उर्जेत आणले. सौर उर्जा प्रकल्पाची शेतकर्‍यांना दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने पायाभरणी केली होती. बाभूळगाव येथील सौर उर्जा प्रकल्प सुरू होऊन प्रतिदिन निर्मित होणारी 25 हजार युनिट वीज शेतकर्‍यांना न देता स्वस्त असलेली वीज महावितरणला विक्री केली जात असल्याचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

दरम्यान, सौर कृषी योजनेपासून शेतकरी वंचित राहत असल्याने विधानभवनात प्रश्न उपस्थित करीत राज्य शासनाला वठवणीवर आणू, असा ईशारा आ. तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. सन 2019 पूर्वीच फडणवीस शासनाने सौर उर्जा प्रकल्प राज्यात आणला होता. हा प्रकल्प शेतकर्‍यांच्या हितासाठी गरजेचा असल्याचे पाहून महाविकास आघाडी शासनाच्या काळात आम्ही सौर उर्जा प्रकल्पाला प्राधान्य दिले. राहुरी मतदार संघात बाभूळगाव, गणेगाव, आरडगाव, वांबोरी व शिरापूर येथे सौर उर्जा प्रकल्पाला आम्ही मंजूरी आणली. यापैकी बाभूळगाव येथील प्रकल्प पूर्ण होऊन सौर उर्जा निर्मिती तीन महिन्यांपासून सुरू झाली. महाविकास आघाडी शासनाने शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी, या स्पष्ट हेतुने सौर उर्जा प्रकल्प आणला, परंतु प्रकल्प कार्यान्वित होऊनही शेतकर्‍यांना वीज पुरवठा केला जात नाही.

त्यामुळे राज्य शासनाच्या धोरणाबाबत शंका- कुशंका निर्माण होत आहेत. बाभूळगाव केंद्रातून दररोज 5 मे. वॅट वीज निर्मिती होत आहे. ही वीज महावितरण कंपनी 3 रूपये युनिटप्रमाणे अत्यंत कमी दरात खरेदी करीत आहे. सौर उर्जा निर्मिती करण्याचा मुख्य हेतू केवळ शेतकरी हिताचा होता. शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळणार असल्याने सौर उर्जेला महाविकास आघाडी शासनाने पाठबळ दिले, परंतु नंतर सत्तेत असलेले शिंदे-फडणवीस शासन काळात शेतकर्‍यांवर अन्याय सुरू झाला आहे. राहुरी मतदार संघात अनेक विकासात्मक कामांना स्थगिती देण्याचे काम राज्य शासनाने केले, परंतु जी कामे पूर्ण झाली त्या कामांनाही अडथळा निर्माण करून नेमका कोणता हेतू साध्य करीत आहेत, हे समजेनासे झाल्याचा संताप आ. तनपुरे यांनी व्यक्त केला.

अ. नगर जिल्ह्यात आम्ही महावितरणमार्फत किती विकास कामे केली, हे जनतेसह लोकप्रतिनिधींना ठाऊक आहे, परंतु विरोधक नेहमी श्रेयवादासाठी झटताना दिसतात. महाविकास आघाडी व आ. तनपुरे यांना सौर उर्जा प्रकल्पाचे श्रेय मिळू नये म्हणून शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे काम होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले. राहुरी मतदार संघामध्ये सौर उर्जा प्रकल्पासाठी बाभूळगाव, आरडगाव, वांबोरी व शिरापूर (पाथर्डी) येथे सौर उर्जा प्रकल्प मंजुरीस मोठे प्रयत्न केले. परिणामी राहुरी मतदार संघामध्ये बाभूळगाव, गणेगाव, आरडगाव, वांबोरी व पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे सौर ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प मंजूरीस कोट्यावधीचा निधी मिळाला. गणेगाव, आरडगाव, वांबोरी व शिरापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती प्रगतीपथावर आहे. अनेक ठिकाणी विरोधक तर काही ग्रामस्थांनी अडचणी मांडल्या. त्यावर मात करून प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे आ. तनपुरे म्हणाले.

बिबट्यांपासून शेतकर्‍यांना सर्वाधिक धोका..!
सद्या सर्वदूर बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. प्रत्येक गावात चार – पाच बिबटे वावरत आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांना शेतात जीव धोक्यात घालून कामे करण्यासारखे झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्री शेतात जाण्याची वेळ येऊ नये, म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण केला, परंतु राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या विरोधी भूमिका घेत शेतकर्‍यांना दिवसा वीज न देण्याचे कारस्थान शेतकर्‍यांना न पटणारे आहे. शासनाला जेरीस आणत सौर उर्जेचे शेतकर्‍यांचे जीवन ऊर्जेत आणू, असा ठाम विश्वास आ. तनपुरे यांनी व्यक्त केला.

श्रेय मिळविण्यासाठी शेतकर्‍यांची अडवणूक का?
सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊनही त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळत
नाही. शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळाली तर आ. तनपुरे यांना त्याचा लाभ होईल, असे गृहीत धरून राज्य शासनासह आमच्या विरोधकांनी निर्मिती झालेली वीज महावितरणला विक्री करण्याचे कारस्थान रचल्याची शंका निर्माण होत आहे. माझ्या विरोधासाठी शेतकर्‍यांची बोळवण करू नका, अशी आर्त विनवणी आ. तनपुरे यांनी यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT