श्रीकांत राऊत
नगर : पुढारी वृत्तसेवा : व्हॉटस् अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या आधारे शाळकरी मुली किंवा तरुणींची छेड काढण्याचे व त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यात सायबर पोलिसांकडे 194 तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साईटस् ब्लॅकमेलिंग करण्याचे अड्डे बनत असल्याचे सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.
स्मार्टफोनचा वाढलेला वापर दिवसेंदिवस घातक होत आहे. सोशल साईटस्वर येत असलेल्या फसव्या लिंकचा वापर करून सायबर चोरटे अनेकांना आर्थिक गंडा घालत आहेत. त्यासोबतच आता सोशल मीडियाच्याआधारे छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरून झालेल्या बदनामीने अनेकांनी जीवन संपविल्याचे प्रकार घडले आहेत. आजच्या व्हर्च्युअल जगात बहुदा तरुणींकडून सोशल मीडियाचा वापर करताना पुरेशी काळजी न घेणेच त्यांना अडचणीत आणत आहे.
सायबर पोलिसांकडे केलेल्या तक्रारींमध्ये तरुणी किंवा महिलांनी अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करणे आणि त्यातून संपर्क वाढविणे त्यांना नंतर अडचणीचे बनल्याचे स्पष्ट होत आहे. बर्याचशा घटनामध्ये अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवत, अनेकदा आपली व्यक्तिगत माहिती शेअर करणे, फोटो पाठविले जातात आणि त्याआधारे अशा व्यक्तींकडून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडले आहेत.
स्वप्नांच्या नगरीत होतोय घात
इन्स्टाग्रामवरिल 'हाय' आणि 'फ्रेन्डशिप' पासून सूरू झालेली ओळख 'लव्हशिप'पर्यंत जाऊन पोहचते. सोशल मीडियाच्या जगात तरूणींना स्वप्नांच्या नगरीतच असल्याचे भासवण्यात येते आणि याच आमिषांना मुली बळी पडतात. व्यक्तीगत माहिती, खाजगी फोटो समोरील व्यक्तीला कळत-नकळत सांगितल्याने छेड काढणे, ब्लॅकमेल करणे हे प्रकार घडतात.
बनावट अकाऊंटवरून चॅटिंग
सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारित तरूणांना देखील ब्लॅकमेल करण्यात आले आहे. फेसबुक, इंन्स्टाग्रामवर मुलगी असल्याचे भासवत बनावट अकाऊंट तयार करून चॅटिंग केली जाते. त्यानंतर या तरूणांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करण्यात येते.
अनेक तक्रारीत नातेवाईकच दोषी
अनेक तक्रारींमध्ये पोलिसांनी तपास केल्यानंतर जवळचे नातेवाईकच दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल न करता आपसात अनेक प्रकार मिटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी
महिना तक्रारी
जानेवारी 07
फेब्रुवारी 22
मार्च 45
एप्रिल 51
मे 29
जून 40
एकूण 194