अहमदनगर

नगर : सोयाबीनवर गोगलगायींचा प्रादुर्भाव

अमृता चौगुले

साकत, पुढारी वृत्तसेवा : साकत परिसरात आजपर्यंत 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. मात्र, पिकाच्या कोवळ्या कोंबाला गोगलगायींनी लक्ष्य केले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे जामखेड तालुका कृषी विभागाने याबाबत प्रचार व मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

कृषी विभागामार्फत शुक्रवारी (दि.15) साकत येथे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मंडल कृषी अधिकारी के. एम. हिरडे, कृषी साहयक आर. बी. चव्हाण, एल. डी. अंकुश यांनी रिमझिम पावसात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. शेतकरी भाऊसाहेब मुरूमकर, दिलीप मुरूमकर, हरिभाऊ वराट, बेबी वराट, पृथ्वीराज वराट ईदी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन त्यांनी माहिती दिली.

उगवलेल्या सोयाबीन गोगलगायी फस्त करीत असल्याने, दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली आहे. साकत, कडभनवाडी, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, दिघोळ या गावातील शेती शिवारात सोयाबीन पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे यावर काय उपाययोजना कराव्यात, यासाठी जामखेड कृषी विभागाने मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी सोयाबीनसाठी खते, बियाणे यावर मोठा खर्च केला आहे. मात्र, उगवलेल्या सोयाबीनच्या कोवळ्या मोडावर (कोंब) गोगलगायींनी हल्ला सुरू केला असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. जमिनीच्या खालील भागात बांधावर गोगलगायींनी कहर केला आहे. त्यांना आटोक्यात आणणे शेतकर्‍यासमोर नवीन आव्हान ठरले आहे. यावर्षी उडीद क्षेत्र कमी होऊन सोयाबीन क्षेत्र वाढले आहे. जवळपास तालुक्यात 12 हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र होऊ शकते, असा अंदाज तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी व्यक्त केला आहे.

रानातील गोगलगायी वेचुन नष्ट केल्या आहेत. मात्र, उगवलेले सोयाबीन गोगलगायींनी नष्ट केल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

                                                                          – संदीप वराट, शेतकरी, साकत

गोगलगायींचा प्रभाव वाढला असला तरी शेतकर्‍यांनी हताश न होता, नियंत्रणासाठी मेटाआल्डिहाईड गोळ्या टाकाव्यात, तसेच शेतात गुळाच्या पाण्यात भिजविलेले पोते ठेवून त्या खाली जमा झालेल्या गोगलगायी नष्ट कराव्यात.

                                                               – राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT