अहमदनगर

नगर : सोनईतील नवीपेठ रस्त्याचे काम प्रगतिपथावर

अमृता चौगुले

सोनई, पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी 14 कोटी रुपये मंजूर केलेल्या सोनई गावातील अनेक रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली असून, सर्व रस्ते दर्जेदार करण्याची सूचना गडाख यांनी सर्व ठेकेदारांना केली आहे. नवीपेठेतील 88 लाख रुपयांचे काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्यामुळे सोनई गावातील सौंदर्यात भर पडून व्यवसायाची भरभराट होणार आहे.

माजी मंत्री गडाख यांनी सोनई येथील दहाव्याच्या ओट्यापासून स्वामी विवेकानंद चौक, स्वामी विवेकानंद चौक ते छत्रपती चौक, कांगोणी रस्त्यावरील छत्रपती चौक ते बालाजी मंदिरमार्गे शिंगणापूर रस्ता, छत्रपती चौक हलवाई गल्ली मार्गे शिंगणापूर रस्ता भूमिपूजन केले होते. आता सर्व कामांची सुरुवात झालेली आहे. मुख्य रस्ता असलेल्या या नवीपेठेतील वाहतुकीची अडचण ओळखून रस्त्याच्या कामाची दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात दहाव्याच्या ओट्यापासून संभाजी चौकापर्यंत रस्त्याचे साईड गटारीचे काम पूर्ण झाले आहे. आता दिवस-रात्र रस्ता उरकरण्यास सुरुवात झाली आहे.

तीनशे मीटर लांबीचा हा रस्ता तीन फूट खोदून मुरूम, खडीकरण व नंतर चार इंच जाडीचे पीसीसी काँक्रीट होऊन त्यावर दहा इंच जाडीचे काँक्रीट होणार असून हा रस्ता सहा मीटर रुंदीचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉक असून साईडला दोन फूट रुंदीचे आरसीसी गटार होणार आहे. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला पाणी उतार काढले जाणार आहे. त्यामुळे गणेशवाडी, लांडेवाडी, करजगाव, खेडले, शिरेगाव, वळण, तसेच श्रीरामपूर, राहुरी व नेवासा येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्या गावांना जोडण्याकरिता या रस्त्याचा प्राधान्याने वापर होत असतो.

नवीपेठेतील रस्त्याला फक्त काँक्रीटची मंजुरी होती. या रस्त्यावरून पाणी जाण्याची सोय नसल्यामुळे या रस्त्याला कायमस्वरूपी दुरुस्तीची गरज पडत होती. व्यापार्‍यांच्या मागणीवरून यात माजी मंत्री गडाख यांनी रस्त्यास साईड गटारही करण्यास सांगितल्याने या रस्त्याची कायमस्वरूपीची अडचण दूर होणार आहे.

                                                                                  – संतोष खोसे, व्यावसायिक.

SCROLL FOR NEXT