अहमदनगर

नगर : सूरत-हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनास शेतकर्‍यांचा विरोध

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारतर्फे सुरत- हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी जमिनीचे संपादन करण्याचे काम वेगाने सुरू आहे; परंतु शेतकर्‍यांनी प्रशासनाने कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही म्हणून भूसंपादनास विरोध केला आहे. यासंबंधी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हंटले की, मांजरसुंबा गावातील शेतकर्‍यांची शेती 100 टक्के बागायत आहे. बहुतांश शेतकर्‍यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असून, सुमारे पन्नास शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात शेती महामार्गात जाणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सर्व शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची सविस्तर माहिती द्यावी, तसेच इतर गावांप्रमाणे जमिनीचा मोबदला द्यावा, अन्यथा जमिनीच्या भूसंपादनाचे काम करून दिले जाणार नाही, असे निवेदन उपजिल्हाधिकारी भूसंपादन सिद्धार्थ भंडारे यांना दिले आहे. शेतकरी जालिंदर कदम, अर्जुन कदम, जयराम कदम, गोवर्धन कदम, सायबा कदम, विलास कदम, भाऊसाहेब कदम, शिवाजी कदम आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT