सिद्धटेक, पुढारी वृत्तसेवा : कर्जत, श्रीगोंदा, दौंड, इंदापूर तालुके, तसेच पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांची जीवनवाहिनी असणारी भीमा नदी दुथडी वाहू लागली आहे. पुणे परिसरात पडणार्या मुसळधार पावसामुळे ही नदी वाहती झाली आहे. त्यामुळे उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आले.
मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी जुलै महिन्यात उजनी प्लसमध्ये आली आहे. या पावसाने उजनी धरण शंभर टक्के भरण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिले, तर धरण 15 ऑगस्टपर्यंत शंभर टक्के भरू शकते. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणार्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चालू पावसाळी हंगामात उजनी धरणाच्या सर्वच पाणलोट क्षेत्राच्या धरणसाखळीत मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून, खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. इतर धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.
मान्सूनमधील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ओढ दिली होती. त्यामुळे उजनी धरणामध्ये समाधानकारक वाढ झाली नसल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते; परंतु आता भीमा नदी वाहती झाल्याने वातावरण निवळू लागले आहे. उजनी धरणाच्या वरील भागात असणारे धरण क्षेत्रात मोठा पाऊस चालू झाल्याने यामधून दौंड येथून गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 50 हजार 119 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होता. पुणे बंडगार्डन येथून 31 हजार 770 क्युसेकने विसर्ग चालू असून, त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2016 मध्ये उजनी 5 ऑगस्टमध्ये, तर 2017मध्ये 20 जुलैला प्लसमध्ये आले, तर 2018 मध्येही 17 जुलैला, तर 2019 मध्ये 29 जुलैला, तर 2020 मध्ये 17 जुलैला प्लसमध्ये आले होते. सर्वसाधारणपणे उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडतो. यावर्षीही जुलैमध्ये मायनसमधून प्लसमध्ये येण्याची वेळ सलग सात वर्षे साधली आहे.
उजनी धरणाची पाणीसाठवण क्षमता 123 टीएमसी असून, त्यापैकी 63 टीएमसी पाणीसाठी मृत आहे, तर 53 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त, तर जादा 10 टक्के सहा टीएमसी आहे. सद्य स्थितीला उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 67.74 टीएमसी, तर उपयुक्त पाणीसाठा 4.08 टीएमसी असून, धरण प्लस 7.62 टक्के झाले आहे. दहिगाव उपसा योजना, सीना – माढा उपसा योजना, भीमा – सीना बोगदा, मुख्य कालव्यामध्ये पाणी बंद आहे.
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे पाणलोट क्षेत्रातून उजनीतून सिंचनासाठी होणारा पाणीउपसा अतिशय कमी प्रमाणात आहे. पाण्याचे नियोजन काटेकोर केल्याने उजनी मायनस पातळी सात टक्क्यांपर्यंत खाली आली. त्यामुळे उजनीचा मायनसचा विळखा लवकर कमी झाला.