अहमदनगर

नगर : साडेतीन लाखांचे मोबाईल परत

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरासह संगमनेर तालुक्यातील घारगाव, आश्वी, तर अकोले पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले 3 लाख 45 हजार रुपयांच्या मोबाईलचा पोलिस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने शोध लावून, चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून ताब्यात घेतलेले मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांनी दिली.

पोलिस उपाधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संगमनेर शहर पोलिस स्टेशन हद्दीतून अनेकांचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. मात्र, चोर सापडत नव्हते. मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांना दिले होते. त्यानुसार मदने यांनी श्रीरामपूर अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलचे पो. कॉ. फुरकान शेख यांना तांत्रिक माहितीचा आधार घेत मोबाईल चोरांचे लोकेशन काढण्याबाबत सूचित केले होते.

पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकातील विशेष पथकातील पोलिस नाईक, अण्णासाहेब दातीर, पो. कॉ. अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांना मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या पथकाने संगमनेर शहर, तालुका, घारगाव, आश्वी, अकोले या परिसरातून गहाळ झालेले मोबाईल चोरांचा शोध घेतला.

SCROLL FOR NEXT