कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक विवेक बिपीनराव कोल्हे यांची, तर उपाध्यक्षपदी रमेश दादा घोडेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रारंभी कारखान्याचे मार्गदर्शक बिपीनराव कोल्हे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपजिल्हाधिकारी उज्ज्वला गाडेकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडल्याबद्दल सत्कार केला.
बिपीनराव कोल्हे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वसा व वारसा अखंडितपणे पुढे चालू ठेवू. कारखान्याच्या 21 जागांसाठी 21 अर्ज दाखल केले, ही सहकार चळवळीतील ऐतिहासिक नोंद होऊन, आदर्शवत ठरेल. हे श्रेय सभासदांसह स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकर्तृत्वाला आहे, असे ते म्हणाले.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी बिनविरोध निवडलेल्या संचालकांचे स्वागत केले. विवेक कोल्हे यांच्या नावाची सूचना त्र्यंबकराव सरोदे यांनी मांडली. त्यास निवृत्ती बनकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी रमेश घोडेराव यांच्या नावाची सूचना विलासराव वाबळे यांनी मांडली. त्यास बाळासाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले.
याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे, विलासराव माळी, सतीश आव्हाड, ऊषा औताडे, सोनिया पानगव्हाणे यांच्यासह अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, शिवाजीराव वक्ते, साईनाथ रोहमारे, प्रदीप नवले, केशवराव भवर, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणूनाथ बोळीज, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, उद्धव विसपुते, संभाजी आहेर, भाऊसाहेब दवंगे उपस्थित होते.