कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान मंदिर परिसरात श्रीकाशी विश्वनाथ महादेव मंदिराचे संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. नाथभाऊ उद्देशीय सेवाभावी संस्था संचलित हेरिटेज कंजर्वेटर्स या संस्थेने काम पूर्ण केले.
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थानचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी 25 नोव्हेंबर 2021 रोजी तत्कालीन अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांच्या स्वर्गवासानंतर पदभार स्वीकारला होता. मठाधिपती स्वामी रमेशगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाने मंदिर संवर्धनाचे काम नाथभाऊ उद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने हाती घेतले. हे काम आता पूर्णत्वाकडे गेले आहे. मंदिराचा गाभारा 13 बाय 13 फुट आहे. कलश 51 फुट तर सभा मंडप 65 बाय 31 फुट आहे.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या हयातीत हे अकरावे काशी विश्वनाथ मंदिर बांधले. मंदिराचे भूमिपूजन शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज व हरि नारायणा नंद महाराज यांच्या उपस्थितीत 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाले, मात्र काही वर्षानंतर मंदिराच्या बेसमेंटपासून 3-4 फुटापर्यंत खार्या पाण्यामुळे चिरेबंदी दगडाचे पोपडे निघत होते. ही बाब लक्षात घेऊन सर्वानुमते मंदिर संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दगडांना प्रथमतः घासण्यात आले. यानंतर सिलिका टाकून स्टोन, स्टेननरद्वारे रासायनिक प्रक्रिया करून सिलिकॉन इथाईल सिमिकेटचे कोटिंग करण्यात आले. आता या दगडांचे आयुष्य वाढले आहे. कितीही पाणी पडले तरी काहीही न होता दहा वर्षांच्या पुढे आयुष्य वाढणार आहे. पुरातत्व खात्याच्या धर्तीवर त्यांच्या कामासारखेच हे काम असल्याची माहिती पैठणचे नाथभाऊ उद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुहास भागवत यांनी दिली.
जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष होळकर यांनी सर्वप्रथम स्वामी रमेशगिरी महाराज कुटियाकडे जाणारा रस्ता तयार केला. पेव्हरब्लॉक बसविले. (दि. 13 जुलै) रोजी समाधी स्थान मंदिर परिसरात गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आदी कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत.