अहमदनगर

नगर : श्रावणात ‘घन’घोर; महिनाभरात सरासरी 105 मि.मी. पाऊस

अमृता चौगुले

नगर, दीपक ओहोळ : श्रावण महिना म्हटले की, पावसाची रिमझिम आणि ऊन-पावसाचा खेळ. परंतु यंदा श्रावण महिन्यात देखील धुवाँधार पाऊस झाला. या महिन्यात सरासरी 105 मि.मी. पावसाची नोंद झाली. श्रावण महिन्यात एवढा धुवाँधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे, तलाव तुडूंब भरून वाहत आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत सरासरी 341.8 मि.मी. पावसाची नोंद असून त्यातील 105 म्हणजे 31 टक्के पाऊस एकट्या श्रावण महिन्यात बरसला आहे.

जून व जुलै या दोन महिन्यांत पाऊस झाल्याने खरीप पेरणी जवळपास आटोपलेली असते. अशा वेळी श्रावण महिना सुरु होतो. श्रावण महिना म्हटला की, सर्वत्र हिरवेगार सृष्टीसौदर्य, रिमझिम पाऊस आणि आकाशात इंद्रधनुष्य असे वातावरण आल्हादायक वातावरण असते. यंदाच्या पावसाळ्यात मात्र, हे सर्वच चित्र बदललेले दिसले.

१० दिवसांत ९१ मि.मि. पाऊस

29 जुलैपासून श्रावण महिना सुरु झाला. 3 ऑगस्टपासून जिल्ह्यात दमदार पावसास प्रारंभ झाला. चार-पाच दिवसांत सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावीत, श्रावण महिना ओलाचिंब केला. या धुवाँधार पावसाने पहिल्या दहा दिवसांत सरासरी एकूण 91.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतरही उर्वरित काही दिवस श्रावणसरी सुरु होत्या. या श्रावण महिन्यात एकूण 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आजमितीस जिल्ह्यात एकूण सरासरी 341.8 मि.मी. पाऊस झाला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एकूण सरासरी 448.1 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत आतापर्यंत 76.3 टक्के पाऊस झाला आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्यांदाच नगर तालुक्यातील सर्व अकरा महसूल मंडलांत धो-धो पाऊस झाला आहे. शहरातील चार मंडलांत 600 मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने शहरातील ओढे नाले वाहिले. सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. याशिवाय अनेक गल्लीबोळीत पाणी तुंबले होते.

श्रावण महिना सणासुदीचा, निसर्गरम्य सौदर्याचा, परंतु 10 ऑगस्टपर्यत झालेल्या सर्वदूर धुवाँधार पावसाने सर्व चित्रच बदलून टाकले होते. या कालावधीत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील भरपूर पाऊस झाला. लहान- मोठी धरणे गळ्यापर्यंत भरली होती. त्यानंतरही काही दिवस पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरुच होता. आढळा यापूर्वीच ओव्हेरफ्लो झाले होते.

गत 26 दिवसांत भंडारदरा धरणात जवळपास दीड हजार, मुळा धरणात सहा हजार दलघफू पाण्याची आवक झाली आहे. यंदा श्रावण महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत ओहोळ, नाले व ओढे जोरात वाहिले गेले. त्यामुळे गोदावरी, प्रवरा व मुळा तसेच काही छोट्या नद्या देखील वाहत्या झाल्या आहेत. मात्र, आता गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतचा पाऊस (मि.मी.)

नगर 336.7, पारनेर 332.7, श्रीगोंदा 320.2, कर्जत 337.2, जामखेड 338.3, शेवगाव 339.1, पाथर्डी 324.3, नेवासा 319.9, राहुरी 329.8, संगमनेर 286.7, अकोले 557.6, कोपरगाव 358.6, श्रीरामपूर 286.3, राहाता 286.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT