अहमदनगर

नगर : शैक्षणिक संस्थेत 75 लाखांचा अपहार

अमृता चौगुले

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : अलाईड एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत चालविल्या जाणार्‍या नॅशलन स्कूलच्या मिळकतीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता एका खासगी फायनान्स कंपनीकडून 75 लाख रुपयांचे कर्ज घेऊन ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी संस्थेच्या एका मयत विश्वस्तांसह सहा जणांच्या विरोधात शहर पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसां कडून अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील अलाईड एज्युकेशन सोसायटी, समनापूर या नावाच्या संस्थेची स्थापना करुन 2002 मध्ये 'नॅशनल स्कूल' या शाळेची उभारणी करण्यात आली होती. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी च्या पैशातून जाकीर करीम तांबोळी यांच्या नावावर खरेदी केलेल्या मिळकतीवरती शाळेची इमारत उभी आहे.

या संस्थेच्या अध्यक्षपदाचा वादही तीन वर्षांपासून सुरू असून न्यायालयामध्ये विषय प्रलंबित आहे. संस्थेचा पूर्वाश्रमीचा अध्यक्ष करीम ईस्माईल तांबोळी मयत असून, जुलै 2018 नंतर पदावर नसताना सुद्धा, त्यांच्या नावात्यातील विश्वस्त व मुख्याध्यापक प्रकाश जालिंदर वर्पे यांनी जानेवारी 2019 नंतर संस्थेचे नाव वापरून खोटी कागदपत्रे तयार करून खोटे कारण देऊन कर्ज मागणी केली होती. त्या अनुषंगाने संस्थेच्या लेटरहेडवर पदाधिकारी असल्याचे भासवून स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने खोटा ठराव करुन, थेरुमेणी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, बेंगलोर यांच्याकडून 75 लाख 31 हजार 350 रुपयांचे कर्ज घेवून त्याचा अपहार केला.

या प्रकरणी शहरातील अलका नगर येथील रहिवासी असणारे संस्थेचे विश्वस्त, तसेच विद्यमान अध्यक्ष रईस अहमद शेख यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादी वरून शहर पोलिसांत करीम ईस्माईल तांबोळी (मयत), जाकीर करीम तांबोळी, वसिम करीम तांबोळी, नाजीम करीम तांबोळी, नजीर इस्माईल तांबोळी (सर्व रा. लोणी, ता. राहाता) व प्रकाश जालिंदर वर्पे (रा. संगमनेर) यांच्या विरोधामध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT