नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँक व विकास मंडळासाठी निवडणूक अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी काही मंडळाच्या दिग्गजांसह प्रमुख पदाधिकार्यांनीही आपले उमेदवारी अर्ज सादर केल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. दरम्यान, बँकेच्या 21 जागांसाठी 852, तर विकास मंडळाच्या 18 जागांसाठी 532 उमेदवारांनी आपले अर्ज भरले असून, आज शुक्रवारी अर्जांची छाननी होणार आहे.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गुरुमाउलीचे नेते बापूसाहेब तांबे, रोहोकले प्रणित 'गुरुमाउली'चे मार्गदर्शक रावसाहेब रोहोकले गुरुजी, गुरुकुलचे डॉ. संजय कळमकर, सदिच्छाचे राजेेंद्र शिंदे, ऐक्यचे राजेंद्र निमसे, इब्टाचे एकनाथ व्यवहारे, शिक्षक संघाचे आबासाहेब जगताप, शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, स्वराज्यचे सचिन नाबगे आदी शिक्षक नेत्यांनी सुरुवातीपासून आपापले सभा, मेळावे घेऊन जोरदार तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी शिक्षक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येते.
मेळाव्याला इकडे, अर्ज तिकडून!
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. जे कार्यकर्ते राजकीय शास्त्राचे'डॉक्टर'कडून धडे घेत होते. ते ऐनवेळी गुरुजीच्या वर्गात दिसले. राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी अशा अनेक ठिकाणीही अन्य मंडळातही अशाप्रकारे राजकीय कोलांटउड्या पहायला मिळाल्या. मंडळाच्या मेळाव्यात पुढे पुढे दिसणारे कार्यकर्ते अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दुसर्याच मंडळात चमकल्याची चवीने चर्चा सुरू आहे.
सर्वाधिक अर्ज संगमनेरातून
प्रत्येक तालुक्यासाठी सर्वसाधारण एक जागा आहे. यात संगमनेर 46, नगर 41, पारनेर 42, कोपरगाव 25, राहाता 28, श्रीरामपूर 37, जामखेड 40, पाथर्डी 43, राहुरी 26, शेवगाव 25, श्रीगोंदा 41, अकोले 27, नेवासा 41, कर्जत 31 अर्ज आले आहेत.
डॉ. कळमकरांसह ठुबे, निमसे, खोसेंचे अर्ज !
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सर्वच मंडळांनी जास्तीत जास्त अर्ज भरून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले आहे. काही नेत्यांनी स्वतःचा अर्ज न भरता कार्यकर्त्यांना 'पुढे' केले, तर काहींनी कार्यकर्त्यांचा विश्वास वाढविण्यासाठी स्वतःच निवडणूक आखाड्यात उतरण्याची तयारी केली. यात गुरुकुल मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर, रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाउलीचे नेते प्रवीण ठुबे यांच्यासह ऐक्यचे राजेंद्र निमसे, शिक्षक भारतीचे दिनेश खोसे या मंडळ प्रमुखांनी स्वतः उमेदवारी अर्ज भरल्याचे दिसले.
कोणाचे किती अर्ज
संघटना बँक विकास मंडळ
गुरुमाउली 150 100
रोहोकले गट 178 110
गुरुकुल 160 94
सदिच्छा 105 46
ऐक्य 37 20
शिक्षक संघ 61 33
इब्टा 85 50
शि.भारती 01 02