अहमदनगर

नगर : शिक्षक बँक निवडणुकीपूर्वीच लाखोंची उधळपट्टी!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेची सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधार्‍यांसह सर्वच मंडळे तन-मन आणि धनाने कामाला लागली आहेत. प्रचार दौरे, मेळावे, भाडोत्री वाहने, जेवणावळ, सभागृहाचे भाडे यावर निवडणुकीपूर्वीच लाखोंची उधळपट्टी सुरू आहे. हा खर्च नेमका कुणाच्या पैशांतून?, असा प्रश्न शिक्षक सभासदांना पडला आहे. सत्तेत आल्यानंतर हा पैसा सभासदांच्या खिशातून अर्थात बँकेच्या तिजोरीतून 'वसूल' केला जाणार अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील 10,464 सभासदांचा शिक्षक बँक हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या बँकेत त्यांच्या आयुष्यभराची पुंजी आहे. आपल्या ठेवींच्या पैशांची उधळपट्टी होऊ नये, अशीच सर्वसामान्य शिक्षक सभासदांची इच्छा आहे. त्यामुळेच बँकेची सत्ता पारदर्शी, निष्कंलक आणि स्वच्छ कारभार करणार्‍या मंडळाच्या हातात देण्यासाठी तो आग्रही दिसतो.

17 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रारंभी रोहोकले गुरुजींच्या 'गुरुमाउली'ने राहुरी विद्यापीठात कार्यशाळेच्या नावाखाली जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर, त्यांचे एकेकाळचे सहकारी व सध्याचे नंबर वन बँक आखाड्यातील विरोधक बापूसाहेब तांबे यांच्या 'गुरुमाउली'ने गुरुजींचा उपस्थितीचा विक्रम मोडीत काढताना तब्बल दोन हजार शिक्षक जमविले. या मेळाव्यासाठी शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून 10-20 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मिष्टान्न भोजनाचीही 'सोय', सोबत 'व्याख्यान' मेजवानी होतीच. त्यामुळे या मेळाव्याचा खर्च कशातून केला, कुणी केला, याचे उत्तर सभासदांचा गैरसमज दूर करण्यासाठी गरजेचे बनले आहे.

शिक्षक संघटनांनाही राजकीय पक्षांची झालर आहेच. यातील काही प्रमुख मंडळे हे संघाच्या विचाराची, भाजपला मानणार्‍या गटाची दिसतात. तर काही मंडळे हे काँग्रेस विचारांची असल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत जिल्ह्यातील शिक्षकांचे मतदान लक्षात घेता विविध राजकीय पक्ष, त्यांचे नेते आपापल्या कार्यकर्त्यांना रसद पुरवल्याशिवाय राहणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे.

3 जुलैला गुरुजींचे शक्तिप्रदर्शन

गेल्या आठवड्यात विद्यापीठात सत्ताधारी नेते बापूसाहेब तांबे यांनी घेतलेल्या मेळाव्याने विरोधकांनीही तयारी वाढवली आहे. त्यासाठी रोहोकले गुरुजींच्या मार्गदर्शनात 3 जुलै रोजी नगर येथे जिल्हा मेळावा घेण्याचे नियोजन केले जात आहे. अर्थात, त्यासाठीही शिक्षकांना वाहन व्यवस्था, जेवनावळी उठविल्या जाणार असल्याचे समजते. हा खर्चही नेमका कशातून करणार, हा प्रश्न कायम असणार आहे.

छोट्या मंडळांच्या 'हॉटेल' बैठका

शिक्षक बँकेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छूक असलेल्या छोट्या मोठ्या संघटनांनी अद्याप आपले जाहीर मेळावे घेतलेले नाहीत. मात्र, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका काही हॉटेलमध्ये घेतल्या जात असल्याचेही पुढे येत आहे. हा खर्च इच्छुकांच्या माथी पडत असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे.

भावी 'डायरेक्टर' वर 'आर्थिक' ओझे?

शिक्षक मेळाव्याचा होणारा खर्च हा ज्यांना उमेदवारी हवी आहे, त्यांच्या माथी मारला जात आहे. त्यासाठी ज्या तालुक्यातून जो शिक्षक आपल्या स्वखर्चातून जास्तीत जास्त शिक्षक घेवून आलेला दिसेल, त्याला उमेदवारी दिली जाईल. अर्थात, त्यासाठी त्याला पुढील 'मागणी'चीही गळ घातल्याचीही चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT