अहमदनगर

नगर : शाळा परिसरात साचले पावसाने तळे!

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने बोल्हेगाव परिसरात श्री.राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतन व श्री देवेंद्रनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परिसरात वाहत आलेल्या पाण्याने मोठे तळे साचले आहे. हे पाणी पुढे सीना नदीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाही. परिसरातील नागरिक हे पावसाचे पाणी पुढे जाण्यास मार्ग काढू देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

शाळा व्यवस्थापनाकडून याबाबत महापालिका प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. परंतु, त्यांनी तात्पुरती मलमपट्टी केल्याने परिस्थिती 'जैसे थे'च आहे. शाळेच्या मैदानात पाणी साचलेले असल्याने, विद्यार्थ्यांना आपल्या वर्गात देखील जाणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांसह व शालेय प्रशासनाची त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

विद्यार्थी पाणी नसलेल्या मोकळ्या मैदानात बसून सध्या ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता शिक्षण घेत आहेत. या साठलेल्या पाण्याने कालांतराने मच्छरांचे प्रमाण वाढून रोगराई पसरू शकते. त्याचा विद्याथ्याना त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व आरोग्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल शिंदे व किशोर डाके यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

SCROLL FOR NEXT