अहमदनगर

नगर : ‘शाळा क्रीडांगण’ कामाची चौकशी करू : जिल्हाधिकारी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा: क्रीडांगण विकास योजनेतून 64 शाळांना मिळालेला निधी, त्याचे झालेले काम वाटप, कामातील गुणवत्ता, याबाबत चौकशी करून संबंधितांकडून खुलासा मागाविणार आहोत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्ह्यातील 64 शाळांच्या क्रीडांगण विकासासाठी प्रत्येकी 7 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.

हा निधी शाळांच्या बँक खाती वर्ग केला जातो. त्यानंतर ठेकेदाराला बिल अदा केले जाते. परंतु, शाळेला अंधारात ठेवून क्रीडांगण विकासाचे काम परस्पर वाटप केल्याचे म्हणणे आहे. तर क्रीडा विभागानेही आम्ही कुणालाही कामाचे टेंडर दिलेले नाही, असे सांगीतले आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येताना दिसत आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना विचारणा केली असता क्रीडांगण विकास योजनेबाबत अद्याप आपल्याकडे कोणी तक्रार केलेली नाही. मात्र, आजच्या वृत्ताचा आधार घेऊन निश्चितपणे संबंधितांकडून खुलासा मागवला जाईल, अशी ग्वाही भोसले यांनी दिली. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांचीही याप्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

क्रीडांगण विकास योजनेची कामे आम्हाला विश्वासात न घेता परस्पर 'वरून'च दिली गेली. त्यामुळे आमच्या शाळेचे काम कुणी व कुणाला दिले, हे आम्हालाही माहिती नाही. केवळ धनादेश घेण्यात आला.
युवराज हारदे
अध्यक्ष, एसएमसी.

SCROLL FOR NEXT