नगर, पुढारी वृत्तसेवा : शालेय जीवनापासून खेळाडू राहिलो आहे. शालेय स्पर्धेचे महत्त्व व खेळाडू हित लक्षात घेता शालेय क्रीडा स्पर्धा तत्काळ सुरू करणार आहे. त्याबाबत याच आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
राजेंद्र कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळाने क्रीडामंत्री महाजन यांची भेट घेतली. यावेळी सचिव शिरीष टेकाडे व विजय जाधव उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले की, शालेय स्पर्धा जुलै अखेर सुरू होतात; मात्र मध्यंतरी शासनात फेरबदल होऊन खातेवाटप रखडले. नंतर विधीमंडळाचे अधिवेशन व त्यात एका मंत्र्याकडे अनेक खातीमुळे शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी मिळण्यास उशीर होत होता. स्कूल गेम फेडररेशन ऑफ इंडियामध्ये दोन गट पडल्याने केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना स्थगिती दिली होती. मात्र, क्रीडामंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाच्या सदस्यांची अॅडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली असून, उशिराने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
त्याच धर्तीवर राज्यात शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी देऊन स्पर्धा पार पाडण्यात याव्यात अशी विनंती डॉ. प्रदीप तळवलकर, राजेश जाधव, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, डॉ. रणजित पाटील, प्रा. हरिश शेळके, प्रा. ईकबाल मिर्झा, गिरीश पाटील, डॉ. क्षितीज भालेराव, डॉ. आसिफ खान, विलास पाटील, प्रवीण पाटील, प्रेम खोडपे, डी. के.चौधरी आदींनी केली.