अहमदनगर

नगर : विष पाजून पत्नीला मारण्याचा प्रयत्न

अमृता चौगुले

संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल शिवानी दीपक जोशी (वय 24) या विवाहित महिलेला तिचा पती, सासू व एका महिलेने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, माझे पती व एका महिलेचे प्रेमसंबंध असून ते लोणी येथे खोली घेऊन राहत असल्याची माहिती मला मिळाली होती. दि. 8 जुलै रोजी मी दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी या दोघांनाही एकत्र धरल्यामुळे आमच्यात मोठा वाद झाला. त्यामुळे पती, सासू व ती महिला हे संध्याकाळी दाढ खुर्द या ठिकाणी आले. 'तू मला लागत नाही, तू निघून जा, मला या महिलेशी लग्न करायचे असून आमच्यात अडसर करू नको असे' पती म्हणाला.

मी या गोष्टीला विरोध केला असता पती व त्या महिलेने मला खाली पाडले. यावेळी मी ओरडू लागल्याने सासूने मला दाबून धरले व त्या महिलेने माझे दोन्ही हात धरले होते. पतीने गोठ्यातून गोचिडाचे औषध आणून 'आज शिवाणीचा विषय संपवून टाकायचा' असे म्हणत मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने औषध पाजले.आश्वी पोलिस ठाण्यात आरोपी दीपक संजय जोशी, कल्पना संजय जोशी ( रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) व आशा डोखे (रा. मांडवे साकूर, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

SCROLL FOR NEXT