अहमदनगर

नगर : वाहनाच्या धडकेत शालेय विद्यार्थी ठार

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहरातील नगर- मनमाड रस्त्यावर खासगी क्लासेसला जाणार्‍या आर्यन अतुल पाटोळे (वय 15) या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

राहुरी खुर्द येथील संजीवनी वसाहत येथे बांधकाम क्षेत्रात काम करणारे अतुल पाटोळे हे कुटुंबियासमवेत राहतात. त्यांना दोन मुले असून त्यापैकी आर्यन हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्य. विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे भल्या सकाळीच तो आपल्या तीन मित्रांसमवेत खासगी क्लासेस साठी जात होता.

संजीवनी वसाहतीच्या बाहेर येताच नगर- मनमाड रस्त्यावर त्यास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. समवेत असलेले मित्रही सदरचा अपघात पाहून घाबरले होते. परिसरातील नागरीकांची मोठी गर्दी जमा झाली. ग्रामपंचायत सदस्य राम तोडमल व दादा शेटे यांनी धाव घेतली. पोलिस पाटील बबनराव अहिरे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. याबाबत मृत आर्यनचे मामा संपत सर्जेराव दाभाडे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT