अहमदनगर

नगर : वरखेडला देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

अमृता चौगुले

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : आषाढ वद्य त्रयोदशी निमित्ताने मंगळवारी (दि. 26) नेवासा तालुक्यातील वरखेड येथे महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत दिवसभरात हजारो भाविकांनी पावसात महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. आई जगदंबेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

आखाडाचा शेवटचा मंगळवार असल्याने पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थानतर्फे रांगेत दर्शन घेता यावे म्हणून दर्शनबारीची व्यवस्था केली होती. नेवासा पोलिसांतर्फे वाहन पार्किंग व सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन पोलिस निरीक्षक विजय करेंच्या मार्गदर्शनाखाली केले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मंदिर देवस्थानतर्फे कडुबाळ गोरे, लक्षाधीश दाणे, सुरेश शिरसाठ व विश्वस्त मंडळाने स्वागत केले.

यानिमित्ताने मंदिर प्रांगणात यात्रा भरली होती. वरखेड येथील महालक्ष्मी देवी लाखो भाविकांचे दैवत असल्याने भाविकांनी श्रद्धेने साडी, चोळी व पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला. यावेळी पोतराजांनी देवीची गाणे सादर केले. कंदुरी प्रसाद देवीला अर्पण करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली. यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT