अहमदनगर

नगर : रिक्त पदांमुळे महसूलची कामे रखडली

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : अव्वल कारकून व मंडलाधिकारी पदाच्या 33 जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त असल्यामुळे महसूली कामे रखडली आहेत. त्यांचा कार्यभार इतर कर्मचार्‍यांवर टाकला जात असल्यामुळे त्यांची देखील दमछाक होत आहे. त्यामुळे महसूल सहायकांना अव्वल कारकूनपदी पदोन्नती देऊन रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे.

संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या वर्षी महसूल सहायकांना अव्वल कारकून व मंडलाधिकारीपदी पदोन्नती दिली. मात्र, यावर्षी 15 ते 17 अव्वल कारकून व मंडलाधिकारी यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे आजमितीस 25 अव्वल कारकून व 8 मंडलाधिकारी असे एकूण 33 पदे रिक्त आहेत.

या रिक्त पदामुळे कर्मचार्‍यांवर कामाचा बोजा वाढला आहे. अतिरिक्त भारामुळे कोणतेच काम मार्गी लागत नाही. त्यामुळे महसूल विभागाची अनेक कामे रखडली आहेत. महसूली कामकाजाला वेग यावा, यासाठी महसूल सहायकांना पदोन्नती देऊन रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, कोषाध्यक्ष विजय धोत्रे, स्वप्नील फलटणे, मेजर गव्हाणे, विजय कांबळे आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT