राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला शहरातील एका खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी आणले होते. तपासणीमध्ये संबंधित सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समजले.
संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपीवर गुन्हा दाखल न केल्याचे पाहता डॉक्टरांनीच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणामध्ये पीडित तरुणीचा मावस भाऊ असलेल्या आरोपीचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याचे समजले आहे.
शहरातील डॉक्टर जयंत कुलकर्णी यांच्याकडे गावातील एक सोळा वर्षीय तरुणीला तपासणीसाठी आणले होते. तरुणीच्या पोटात दुखत असल्याने तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले. अविवाहित असलेली तरुणी गर्भवती असल्याचे लक्षात येताच डॉ. कुलकर्णी यांनी विचारपूस केली. तरुणीवर तिच्या मावस भावानेच सन 2021 पासून वेळोवेळी अत्याचार केल्याने हा प्रकार घडल्याची माहिती देण्यात आली.
डॉ. कुलकर्णी यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. श्रीरामपूर विभाागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, चारूदत्त लोखंडे यांनी धाव घेत घटनेची सविस्तर माहिती घेतली.
याप्रकरणातील आरोपी हा एप्रिल महिन्यात झालेल्या एका अपघातामध्ये मृत पावल्याचे समोर आले आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात मयत आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस उपनिरीक्षक बोकील हे करीत आहेत.