अहमदनगर

नगर : राज्यमार्ग बनला खड्ड्यांचा मार्ग

अमृता चौगुले

बोधेगाव, पुढारी वृत्तसेवा : शेवगाव – गेवराई राज्य मार्ग खड्ड्यांचा मार्ग झाला असून, या राज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना खड्ड्यात रस्ता शोधावा लागतो.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा प्रमुख राज्यमार्ग शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातून शेवगाव, राक्षी, चापडगाव, बोधेगाव, बालम टाकळी, सुकळीमार्गे मराठवाड्याच्या सरहद्दीवरील बीड जिल्ह्यातील गेवराईच्या चकलांबा फाटा, धोंडराईमार्गे बागपिंपळगाव नजीक औरंगाबाद – सोलापूर – नांदेड राष्ट्रीय महामार्गाला मिळतो.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेवगाव उपविभागीय अभियंत्याच्या नियंत्रणात असलेला सुकळी फाटा ते शेवगाव, असा जवळपास 35 किलोमीटरचा राज्य मार्ग पूर्णपणे उखडला आहे. चार दोन किमीचा अपवाद वगळता पूर्ण रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. लहान-मोठ्या खड्ड्यांनी पूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून दररोज लहान-मोठी हजारो वाहनांची वर्दळ असते. वाहने चालवताना चालकास तारेवरची कसरत करावी लागते. संततधार पावसामुळे या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचलेले असते, यावेळी चालकास वाहन चालवताना खडड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने अपघात होतात. अनेक वाहनांना अपघात होवून प्रवाशांना हातपाय गमवावे लागले आहेत. हा राज्य मार्ग बोधेगावच्या सुमारे दीड किमी बाजारपेठेतून जातो.

मार्गालगतच जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालय, इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. सकाळी शाळा भरताना आणि संध्याकाळी सुटताना हजारो विद्यार्थ्यांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असते, त्यात वाहनांची प्रचंड गर्दी, वाहने खड्डे चुकवत रस्त्याच्या कडेला येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना जिव मुठीत धरून चालावा लागते. हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात चापडगाव, बालम टाकळी येथे आहे.

याच वर्षी एप्रिल, मे महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने या राज्य मार्गावरील थातूरमातूर खड्डे बुजवले; परंतु दोन-तीन महिन्यांनंतर पहिल्याच पावसात बुजवलेले खड्डे दुप्पट मोठे, तर झालेच, परंतु पुन्हा नवीन खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली. हा खड्ड्यांचा राज्यमार्ग तयार झाला. संततधार पडणार्‍या रिमझिम पावसामुळे, तर गावातून जाणार्‍या मार्गाला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या राज्य मार्गाला कोणीच वाली नाही का? असा प्रश्न पडला आहे.

नव्या ठेवींचे प्रमाण 47.1 टक्क्यांनी घटले

शेवगाव आणि गेवराई तालुक्याचे आमदार मोनिका राजळे आणि आमदार लक्ष्मण पवार हे दोन्ही भाजपचे आमदार आहेत. अडीच वर्षे आघाडी सरकारने त्यांना निधी दिला नाही, सापत्न भावाची वागणूक दिली, असा आरोप आजपर्यंत करीत होते. त्यामुळे या राज्य मार्गाचे काम रखडले असल्याचे सांगतात; पण आता भाजप आणि शिंदे सरकार आले आहे. या सरकारकडून या मार्गासाठी भरीव निधी आणून रस्त्याचे काम करावे, अशी दोन्ही तालुक्यांतील नागरिकांनी मागणी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT