अहमदनगर

नगर : रथ मार्गावरील वीज खांबाचा अडथळा दूर

अमृता चौगुले

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : येथील ग्रामदैवत संत गोदड महाराजांच्या रथ मार्गातील 35 वर्षांचा अडथळा अखेर आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने दूर झाला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संत गोदड महाराजांची रथयात्रा आषाढ महिन्यात कामिका एकादशीला भरते. यावेळी लाकडी रथामध्ये पांडुरंगाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीच्या मार्गामध्ये झारेकरी गल्लीमध्ये एका धार्मिक स्थळासमोर असलेला विजेचा खांब अडथळा होता.
रथ मार्गातील हा खांब अतिशय धोकादायक होता. रथ जेव्हा या परिसरात येतो. त्यावेळी प्रचंड गर्दी दर्शनासाठी होते. हा रथ भाविक दोर लावून ओढतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे नियंत्रणात राहत नाही. या परिसरात होणारी भाविकांची प्रचंड गर्दी आणि रथ आणि धोकादायक विजेचा खांब यामुळे या पूर्वी दुर्घटना होऊन एका भाविकाचा पाय मोडला होता.

कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बैठकीत या धोकादायक विजेच्या खांबाचा प्रश्न भाविकांनी व यात्रा कमिटीच्या सदस्यांनी उपस्थित केला होता. यावेळी आमदार रोहित पवार यांनी भाविकांसाठी धोकादायक असलेला हा विजेचा खांब काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी संत नरहरी सोनार दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष सचिन कुलथे, यात्रा कमिटी, महावितरणचे अधिकारी व काही प्रशासकीय अधिकार्‍यांवर ही जबाबदारी दिली होती.

सोमवारी नगरपंचायत, महावितरण, पोलिस व स्थानिक पदाधिकारी, नागरिक यांच्या मदतीने आणि पुढाकारामधून हा विजेचा खांब अन्यत्र हलविण्यात आला. यामुळे रथ मार्गातील या परिसरातील मोठा अडथळा दूर झाला आहे. यावेळी नगरसेविका ताराबाई कुलथे, सचिन कुलथे, नगरसेवक रज्जाक झारेकरी, महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास जमदाडे यांच्यासह पदाधिकारी, यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

रथ मार्गावर 35 वर्षांपासून हा विजेचा खांब अडथळा येत होता. आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत हा अडथळा दूर केला. यासाठी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक, यात्रा कमिटी, प्रमुख नेते व स्थानिकांची मदत झाली.

– सचिन कुलथे, अध्यक्ष, संत नरहरी दिंडी सोहळा

SCROLL FOR NEXT