अहमदनगर

नगर : ‘मुळा’च्या ओव्हर फ्लोतून महिनाभर राहणार आवर्तन सुरु

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यातून वांबोरी उपसा योजनेच्या जलवाहिनीद्वारे आवर्तन सुरू केले आहे. दरम्यान, हे ओव्हरफ्लोचे आवर्तन महिनाभर सुरु असणार आहे. नंतर धरणातील मंजूर 680 दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सुरू होईल. टेल टू हेड तलाव भरले जातील, अशी ग्वाही माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी येथे रविवारी (दि.21) पत्रकार परिषदेत आ. तनपुरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, जिल्हा उपप्रमुख रफिक शेख, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे आदी उपस्थित होते. आ. तनपुरे म्हणाले, मुळा धरण 98 टक्के भरले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी नदीपात्रातून व उजव्या, डाव्या कालव्याद्वारे सोडले आहे. पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वांबोरी योजनेचे आवर्तन सुरू करण्याचा आग्रह होता. पाथर्डी व नगर तालुक्यातील दुष्काळी भागाला धरणातील ओव्हरफ्लोचे अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी वांबोरी योजनेच्या देखभाल, दुरुस्तीची कामे करण्यासाठी जलसंपदा, यांत्रिकी, विद्युत विभागाकडे पाठपुरावा केला.

वांबोरी योजनेच्या पंपगृहातील आवश्यक कामे युद्ध पातळीवर पूर्ण करून घेतली, असे सांगत आ. तनपुरे म्हणाले, काल (शनिवारी) योजनेचा एक विद्युत पंप सुरू केला. परंतु, गुंजाळेपर्यंत काही ठिकाणी जलवाहिनी गळती असल्याने (रविवारी) पाणी बंद ठेवून गळती काढण्याचे काम पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला तीन-चार दिवस जलवाहिनीची गळती काढण्यासाठी आवर्तन विस्कळीत राहील, नंतर विना खंडित आवर्तन सुरू होईल, असे ते म्हणाले.दरम्यान, आज (सोमवारी) खोसपुरी (ता. पाथर्डी) येथील जलकुंभापर्यंत पाणी पोचणे अपेक्षित आहे. तेथून करंजी व मिरी लाईनद्वारे शेवटच्या टोकापासून पाझर तलावात पाणी सोडण्यास सुरुवात होईल. सातवड, मढीपर्यंत पाणी पोहचविले जाईल. टेल टू हेड पाणी दिले जाईल. अतिरिक्त पाण्याचे आवर्तन एक ते दीड महिना चालेल. त्याशिवाय धरणातील 680 दशलक्ष घनफूट मंजूर पाणी मिळणार आहे.

यंदाही वांबोरी चारीला उच्चांकी पाणी

वांबोरी उपसा योजनेत राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील 43 गावांमधील 102 पाझर तलाव समाविष्ट आहेत. मागील दहा वर्षांत वांबोरी चारीला जेवढे पाणी दिले नाही, तेवढे तीन वर्षांत दिले आहे. यंदाही वांबोरी चारीला उच्चांकी पाणी दिले जाईल, असे आ. तनपुरे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT