अहमदनगर

नगर : मुख्यालयी न राहता भाडे घेणार्‍यांवर गुन्हे नोंदवा

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा: मुख्यालयी न राहता शासनाकडून घरभाडे वसूल करणार्‍या शिक्षक, ग्रामसेवकांसह सर्व सरकारी कर्मचारी यांच्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, तसेच कर्मचार्‍यांनी दिलेल्या ग्रामसभेच्या खोट्या ठरावांची शहानिशा करावी, या मागणीसाठी कांगोणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोपानराव रावडे यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हयातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, मुख्याध्यापक, कृषी सहायक, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक आदींनी मुख्यालयी राहून कामकाज करावे, असे शासनाचे आदेश आहेत.

त्यासाठी त्यांना शासनाकडून घरभाडे आणि भत्ता दिला जातो. मात्र, हा भत्ता आणि घरभाडे घेवूनही अनेक कर्मचारी हे मुख्यालयात राहतच नसल्याचे समोर येत आहे. गावचे सरपंच, गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी या वरिष्ठ अधिकार्‍यांचे त्यांना आशीर्वाद आहेत. त्यामुळे या प्रक्रियेची चौकशी करून त्यात दोषी आढळणार्‍या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रावडे यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर हे याप्रश्नी कठोर भूमिका घेणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT