अहमदनगर

नगर : ‘मिशन’कडून भिक्षेकर्‍यांचे पुनर्वसन

अमृता चौगुले

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : कोरोना एकल महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी मिशन वात्सल्य समितीने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भिक्षेकरी पुनर्वसनाची जबाबदारी देखील या समितींवर सोपविली आहे.

श्रीरामपूर तालुका शासकीय मिशन वात्सल्य समितीची बैठक मंगळवारी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीच्या सदस्य सचिव व प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी मिशन वात्सल्य समितीकडे भिक्षेकरी पुनर्वसनाची जबाबदारी सोपविणार्‍या शासन निर्णयाची माहिती दिली. याप्रसंगी अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, सहायक गटविकास अधिकारी यू.डी. शेख, पंचायत समितीचे आरोग्य सहायक बी. एल. बनसोडे, श्रीरामपूर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय आरणे, समूह संघटक हरिष पैठणे, पुरवठा विभागाचे निरीक्षक एस. यू. पुजारी आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल (विधवा) झालेल्या महिला, बालकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने 27 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यभरात तालुकास्तरावर मिशन वात्सल्य समितीची स्थापना केली आहे. त्यानुसार प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली मिशन वात्सल्य समिती गठित करण्यात आलेल्या आहेत.

वात्सल्या समितीवर जबाबदारी

आता 25 जुलै 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार मिशन वात्सल्य समितीकडे भिक्षेकरी पुनर्वसनाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यातील महिला, पुरुष व बालके अशा भिक्षेकर्‍यांची माहिती प्राप्त करून घेऊन अशा भिक्षेकर्‍यांना न्यायालयाच्या आदेशानुसार जवळच्या भिक्षेकरीगृहात दाखल करणे, तसेच आवश्यकतेनुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, संपूर्ण तालुक्यात आढळणार्‍या मनोरुग्ण, दिव्यांग, दुर्धर आजाराने पीडित भिक्षेकर्‍यांची माहिती उपलब्ध करून घेणे, अंमली पदार्थाचे व इतर व्यसन असलेल्या भिक्षेकर्‍याचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, भिक्षा मागणार्‍या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना जिल्हा बालकल्याण समितीसमोर हजर करून अशा बालकांना बालगृहामध्ये दाखल करण्याबाबतची कार्यवाही करणे अशा जबाबदार्‍या तालुका मिशन वात्सल्य समितीवर सोपविण्यात आलेल्या आहेत. याबाबत समितीने दर पंधरा दिवसांनी बैठकीत आढावा घेऊन भिक्षेकरी पुनर्वसनासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कृती दलास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील कोरोना मृतांची आकडेवारी आतापर्यंत उपलब्ध होत नव्हती. मात्र, मिशन वात्सल्य समितीमध्ये वारंवार चर्चा झाल्यानंतर नगरपालिकेत आता शहरातील कोरोना मृतांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत शहरातील 48 कोरोना एकल महिलांची नोंदणी झाली आहे.

एकल महिलांना निराधार योजनांचा लाभ

श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील कोरोना एकल महिलांना संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचा, तसेच स्वस्त धान्य दुकानातून राबविल्या जाणार्‍या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

SCROLL FOR NEXT