शेवगाव तालुका, पुढारी वृत्तसेवा : अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना पोलिसांनी पकडलेल्या डंपरचा अहवाल सादर करण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालायतील महसूल सहाय्यक हरेश्वर रोहिदास सानप (वय 36) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.27) दुपारी 4 च्या सुमारास शेवगाव तहसील कार्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.
सन 2020 मध्ये शेवगाव पोलिस ठाण्यात वाळू चोरीबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी सदर गुन्ह्यात तक्रारदाराचा वाळूचा डंपर जप्त करण्यात आला होता. सदर डंपर हा अजूनही जप्त असल्याने तो मिळविण्यासाठी तक्रारदारानेे न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरून न्यायालयाने शेवगावच्या तहसीलदारांकडून अहवाल मागविला होता. हा अहवाल तहसीलदारांकडून तक्रारदाराच्या बाजूने तयार करून देण्यासाठी 1 लाख रुपये व घराच्या बांधकामासाठी एक डंपर वाळू, अशी मागणी आरोपीने केली होती.
त्यातील पहिला टप्पा 50 हजार रुपये स्वीकारताना सदर कर्मचार्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे उपाअधीक्षक अभिषेक पाटील, कॉन्स्टेबल प्रकाश महाजन, मनोज पाटील, उमेश पाटील आदींनी केली. या कारवाईमुळे बहुतांशी शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी तहसीलदार छगन वाघ यांनाही चौकशी करण्यासाठी शेवगावच्या शासकीय विश्रामगृहावर बोलावले होते.
न्यायालयात तहसील कार्यालयाचे म्हणणे सादर करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अहवालावर मी तीन-चार दिवसांपूर्वी सही करून संबंधिताकडे दिला होता. त्यामुळे या प्रकरणात आपला काहीही सबंध नाही.
– छगन वाघ, तहसीलदार, शेवगाव