अहमदनगर

नगर : मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आत्मक्लेश

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण तातडीने द्यावे, यांसह मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे क्रांती मैदानावर मंगळवारी (दि.9) मूक आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे. राज्यभरातील पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी दिली.
मराठा समाजास आरक्षण मिळावे, ही गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी आहे. महासंघानेच सर्वांत आधी आरक्षणाची मागणी केली होती. त्यासाठी अनेक वर्षे सातत्याने आंदोलने केली. कोपर्डी घटनेनंतर राज्यात 58 मोर्चे निघाले. आरक्षणासाठी शेकडो तरुणांचे बळी गेले. मागील देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारने 16 टक्के आरक्षण दिले. परंतु, ते कोर्टात न टिकल्याने मराठा समाजाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागले.
आता राज्यामध्ये सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे-देवेंद्र फडवणीस यांचे सरकार आले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न शासनाने गांभीर्याने न्यायालयात मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, या समाजाच्या इतर विविध मागण्यांसाठी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी त्यांनी क्रांती मैदानावर मूक आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोश नानावटे, युवक अध्यक्ष रणजित जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यानी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन दहातोंडे यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT