संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरण आणि वाहन चालकांकडून टोल वसूल करणार्या टोल कंपनी प्रशासनाला जाग यावी. याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष किशोर डोके यांच्या नेतृत्वाखाली मार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत गांधीगिरी करून कार्यकर्त्यांनी स्वतःहून खड्ड्यात माती टाकून खड्डे बुजविण्याचे अभिनव आंदोलन केले.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पठार भागात विविध ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. या महामार्गावरून दररोज प्रवासी व मालवाहतूक वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे परिणामी अपघात होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी टोल कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ हे खड्डे बुजवावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनी दिला आहे.
मनसेचे खंडू जाधव, संकेत लोंढे, अविनाश भोर, दर्शन वाकचौरे, संदीप आव्हाड, रामा कुरकुटे, सुजीत कुरकुटे, वसीम पटेल, बाबाजी मुके, जालिंदर मरभळ, सचिन बोडके आदी मनसैनिकांनी एकत्र येत माहुली घाट, मल्हारवाडी, बोटा येथील खड्ड्यांमध्ये गांधीगिरी करीत वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.