अहमदनगर

नगर : मनपाने केले 66 किलो प्लास्टिक जप्त

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीत 1 जुलैपासून प्लास्टिक वापरास बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनपाच्या पथकाने शहरातील सुमारे दोन हजार दुकानांची तपासणी केली. त्यात सुमारे साडेचारशे दुकानात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आला असून, सुमारे 66 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वस्तू वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल), मिठाई बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेट पाकिटे याची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिकच्या काड्यासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लॉस्टिकचे झेंडे, अशा अनेक वस्तूंवर शासनाने बंदी घातलेली आहे. महापालिका हद्दीत त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, व्यापार्‍यांनी बैठक घेऊन 10 जुलैपर्यंत मुदत वाढ मागितली होती.त्यानुसार आयुक्तांनी दहा तारखेपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर मनपाच्या पथकाने दुकानाची तपासणी करण्यास सुरूवात केली. पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यानंतर समज दिली जात आहे. मात्र, दुसर्‍यांदा प्लास्टिक आढळल्यास गुन्हा दाखल करून दंड आकारण्यात येत आहे.

एक महिन्यात मनपाच्या पथकाने नगर शहरातील सुमारे दोन हजार दुकानांची तपासणी केली. त्यात सुमारे साडेचारशे दुकानात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आला असून, सुमारे 66 किलो प्लॉस्टिक जप्त करण्यात आले. प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांना तीस हजार रुपयांचा दंड केला आहे. एक ऑगस्टपासून व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशव्या व अन्य प्लास्टिक आढळल्यास थेट कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे.

एक जुलैपासून प्लास्टिक वापरास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या एक महिना प्लास्टिक वापरणार्‍या व्यावसायिकांना समज दिली आहे. आता थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

                                                           – डॉ. शंकर शेडाळे, घनकचरा विभागप्रमुख

SCROLL FOR NEXT