अहमदनगर

नगर : मतदारयादी कार्यक्रमात बदल

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रारुप मतदार यादी सोमवारी प्रसिध्द केली आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे यादी प्रसिध्द होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत सर्व तालुक्यांची यादी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे 25 जुलैपर्यंत नागरिकांना हरकती सादर करता येणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरु आहे.त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि.18) प्रारुप मतदार यादी ऑनलाईन टाकली आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे यादी प्रसिध्द होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या कार्यक्रमात काही सुधारणा केली आहे.

नवीन कार्यक्रमानुसार बुधवारपर्यंत यादी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता प्रारुप मतदार यादीबाबत 25 जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. उपलब्ध होणार्‍या हरकतींवर सुनावणी होऊन 29 जुलै रोजी गट व गणनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर ही मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी मतदान केंद्रनिहाय प्रसिध्द होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT