नेवासा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भालगाव परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ बर्डे यांच्या घरासमोरील दोन शेळ्या बिबट्याने रात्री फस्त केल्याची घटना घडली आहे.
जायकवाडी धरणग्रस्त गाव असलेल्या भालगावमध्ये गोदावरी किनार्यामुळे ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यापूर्वीही या भागात अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झालेले आहे. यावेळी मात्र थेट लोकवस्तीत बिबट्याने प्रवेश केला आणि घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्या मारून टाकल्या. सकाळी नवनाथ बेर्डे यांना एक शेळी जागेवर मृतावस्थेत आढळून आली. एक शेळी बिबट्याने ओढत नेल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचे बघावयास मिळत आहे. घटना समजल्यानंतर पोलिस पाटील बाळकृष्ण भागवत, बाळासाहेब आहेर, ग्रामविकास अधिकारी सतीश मोटे यांनी घटनास्थळी भेट दिली. वन अधिकार्यांना घटनेची माहिती दिली.
वन अधिकारी पाठक यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. नवनाथ बर्डे व ग्रामस्थांनी नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा व बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. बिबट्याने शेळ्या फस्त केल्याच्या या घटनेला 48 तास उलटून गेले तरी पिंजरा लावण्यात आलेला नाही. बिबट्याचे दर्शन मात्र परिसरातील लोकांना होतच असल्याने परिसरात अजूनही भीतीचे वातावरण आहे.