अहमदनगर

नगर : भात पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

अमृता चौगुले

अकोले, पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये भात हे प्रमुख पीक मानले जाते. भात शेतीवरच इथल्या आदिवासी बांधवांचा संसार आणि उदरनिर्वाह अवलंबून असतो. चालू खरीप हंगामात जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने कसेबसे उतरलेले भात रोपे नंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर धडपड सुरू असल्याचे दिसते.

आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक, तसेच भात खासराच्या छोट्या छोट्या जमिनी असलेले आहेत. कमी क्षेत्रावर गुजराण करावी लागत असल्याने अगोदरच वर्ष कसे काढायचे? हा प्रश्न निर्माण झालेला असतो. बहुसंख्य शेतकरी खरिपाची कामे आवरल्यानंतर दोन पैसे हातात पडावेत म्हणून मोलमजुरीसाठी आपली गावे सोडून काही काळासाठी स्थलांतर करीत असतात. त्यातच यंदा अतिवृष्टीमुळे भात रोपे म्हणावी तेवढी सुदृढ आणि तजेलदार नसल्याने शेतकरी वर्गात चिंता आहे.

अतिवृष्टीपासून भात रोपांचे संरक्षण करण्यासाठी रोपवाटिकेत जास्त झालेले पाणी शेताबाहेर काढून देण्याचे नियोजन बहुसंख्य शेतकरी करत आहे. पिवळ्या पडलेल्या रोपांना वाचवण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चूळ भरणी रोपांना करावी, तसेच कॅल्शियम नायट्रेट या खताची फवारणी द्वारे मात्र द्यावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी शेतकरी वर्गाला दिलेला आहे. अतिवृष्टीमुळे पाळीव प्राण्यांची हाल होत आहेत. पावसामुळे जनावरे करण्यासाठी सोडता येत नाहीत आणि घरात मुबलक चारा उपलब्ध नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

आषाढ सरी पुन्हा सक्रीय

गत दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाणलोटात आषाढ सरी पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. काल सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 9844 दलघफू (89.17) टक्के झाला होता. तर धरणातून 3609 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 49 मिमी झाली आहे.

निळवंडेतील पाणीसाठा वाढतोय

भंडारदरातून पाणी सोडण्यात येत असल्याने निळवंडेतील पाणीसाठा वाढत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 6773 दलघफू (81.40 टक्के) होता. या धरणातून प्रवरा नदीत 3305 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटात पाऊस वाढल्याने हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुळा पाणलोटातही पावसाने पुन्हा काहीसा जोर पकडल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. काल सकाळी कोतूळ येथील 4429 क्युसेक असलेला विसर्ग सायंकाळी 5638 क्युसेक झाला होता. रात्रीतून त्यात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. धरणातील साठा 18139 दलघफू (69.76 टक्के) झाल आहे. आज हा साठा 70 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. काल धरणात 137 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दरम्यान, राहाता तालुका प्रतिनिधीने कळविले की, दारणा, गंगापूर व अन्य धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीचा विसर्ग 28930 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.

पर्यटकांची गर्दी

काल रविवार सुटीचा दिवस असल्याने अकोले तालुक्यातील भंडारदरातील फुललेले सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दोन वर्षांनंतर या भागातील हॉटेल व अन्य व्यावसायिकांची दुकाने गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT