अहमदनगर

नगर : भजन, कीर्तनातील भक्तीने पांडुरंग अवतरेल

अमृता चौगुले

कोपरगाव / शिर्डी, पुढारी वृत्तसेवा : वारकर्‍यांचा महाकुंभ समजला जाणारा आशिया खंडातील सर्वात मोठा, गिनीज बुकमध्ये नोंद असलेला 175 वा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहास मंगळवारी थाटात प्रारंभ झाला. त्यानिमित्त आज (मंगळवारी) कोकमठाण येथून सकाळी 10 वाजता सजविलेल्या अश्वरथातून सराला बेटाचे अधिपती महंत रामगिरी महाराज यांची हत्ती, घोडे, उंट, ढोलताशा, लेझीम व झांज पथकाच्या गजरात सनई- चौघड्याच्या निनादात गावोगावच्या भजनी मंडळाच्या सुश्राव्य अभंगवाणीत सप्ताहस्थळापर्यंत भव्य ऐतिहासिक मिरवणूक निघाल्याने या सप्ताह सोहळ्याचा श्रीगणेशा अविस्मरणीय ठरला.

यावेळी रस्त्यावर जागोजागी ऐतिहासिक देखावे, ग्रामस्थांचे रामायणातील देखावे हे भाविकांचे आकर्षण ठरले. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समाज प्रबोधनात्मक देखावे व पथनाट्यांचे सादरीकरण भाविकांच्या नियोजनातून करण्यात आले. मिरवणूक मार्गावर कोकमठाण शिवारात माळरानावर कलशधारी सुवासिनी, तुळशी वृंदावनधारी महिला, संतमेळा व सहभागी पथकांचा रिंगण सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थित पार पडला.

मिरवणूक भजन मंडपात पोहोचताच महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते अखंड यज्ञ प्रज्वलित करून, सद्गुरु गंगागिरी महाराज, ब्रह्मलिन नारायणगिरी महाराजांसह सर्व संतांच्या प्रतिमांसह विणा पूजन करून पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.

शेतकरी सुखी होऊ दे, अशी प्रार्थना

याप्रसंगी महंत रामगिरी महाराज म्हणाले, अखंड हरिनाम हा तपस्या यज्ञच आहे. गंगागिरी महाराज हे निष्काम सन्याशी होते. त्यांच्या परंपरेतील हे कार्य बेटाचे सेवक म्हणून आम्ही पुढे नेत आहोत. अहोरात्र अखंड भजन पाहिल्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी अवतरल्याशिवाय रहाणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत फक्त भक्ती करताना ती निःस्वार्थ अंतःकरणाने केली पाहिजे. सद्गुरुंच्या कृपेने सप्ताह पार पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे, अशी प्रार्थना याप्रसंगी महंत रामगिरी महाराजांनी केली.

यावेळी प्रमुख उपस्थित श्रीसाई संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे, शंकरराव कोल्हे साखर कारखाना अध्यक्ष विवेकभय्या कोल्हे, आत्मा मलिक ध्यान पिठाचे संत- महंत, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी सभापती संभाजी रक्ताटे, शरदराव थोरात, सुरेश थोरात, बाळासाहेब कापसे, अशोकराव बोर्‍हाडे, शिवाजी ठाकरे, ज्ञानेश्वर टेके, भाऊसाहेब झिंजुर्डे, भाऊलाल सोमासे, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, दत्तू पा. खपके, नंदू निकम आदींसह बेटाचे विद्यार्थी, शिष्य, महाराज मंडळी, बेटातील शिष्य गण, पंचक्रोशीतील हजारो वारकरी भाविक, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह पोलिस प्रशासन, महसूल अधिकारी व सुमारे 4 लाखावर भाविकांचा जनसागर लोटला होता.

मांडे, पुरणपोळीचा महाप्रसाद

सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मांडे व पुरणपोळीचा महाप्रसाद दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव, येवला, नांदगाव, वैजापूर व सप्ताह पंचक्रोशितील गावांनी 20 हजार लिटर दुधाचा महाप्रसाद वाटप केला तर गोदावरी दूध संघाने दूध वाटले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT