अहमदनगर

नगर : भगवंतासाठी रडणार्‍यांचे गीत तयार होते

अमृता चौगुले

झरेकाठी, पुढारी वृत्तसेवा : जो भगवंतासाठी रडतो त्याचे गीत तयार होते. गोपी पाच हजार वर्षांपूर्वी भगवंतासाठी रडल्या, त्यांचे गीत तयार झाल्याचे रसाळवाणीतून अमोघ वर्णन सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. श्रीक्षेत्र कोकमठाण येथील सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतप्रसंगी काल्याच्या कीर्तन सेवेचे शेवटचे पुष्प गुंफताना महंत रामगिरी महाराज अथांग जनसागराला मार्गदर्शन करताना बोलत होते.

देशभर प्रसिद्ध असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथे महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज (मंगळवारी) मोठ्या थाटात पार पडला. त्याचा प्रत्यक्ष लाभ आठव्या व समाप्तीच्या दिवशी लाखो भाविकांनी घेतला. सकाळी साडेअकरा वाजता महंत रामगिरी महाराज यांनी आपले कीर्तन पुष्प गुंफले.

महंत रामगिरी महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा
कृष्णे वेधली विरहिनी बोले, चंद्रमा करितो उबारे गे माये॥
न लावा चंदनू न घाला विजनवारा। हरिविणे शून्य शेजारू गे माये ॥
माझे जिवीचे तुम्ही का वो नेणा । माझा बळीया तो पंढरीराणा वो माये ॥
हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला होता.

मान्यवरांची उपस्थिती

याप्रसंगी श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, कोपरगाव बेटचे महंत रमेशगिरी महाराज, जनार्दन स्वामी विश्वस्त मंडळ, स्वामी गिरीजानंद महाराज, तुषार भोसले, ओरिसाच्या खा. मंजुलता मंडल, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बबनराव घोलप, कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यान केंद्राचे संत परमानंद महाराज व संत-महंत, सेवागिरी महाराज, जिल्ह्यातील मान्यवर राजकीय नेते आणि लाखो लोक उपस्थित होते.

महंत रामगिरी महाराज म्हणाले, चंद्राच्या प्रकाशात पिवळेपणा आहे. परमात्म्याचा शामलवर्ण आहे, असे सांगत रुक्मिणीने पांडुरंगाला पत्र लिहून त्यांचे कौतुक केले, त्याचा दृष्टांत देवून, महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताह समितीच्या कार्याचे कौतुक केले. गोपी म्हणजे काय, याचे विश्लेषण करताना, महंत रामगिरी महाराज म्हणाले, आत्म्यात स्त्री-पुरुष भेद असत नाही. तो जन्म पश्चात निर्माण होतो. भगवंताच्या वेणूचे प्रभाव वर्णन करताना त्यांनी मिलनानुरागाचे उदाहरण दिले. भगवंताच्या वेणूने गायांच्या धारा वाहू लागल्या होत्या, असे सुंदर, व रसाळ वर्णन महंत रामगिरी महाराज यांनी केले. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे आदींनी मनोगत व्यक्त केले.

पांडुरंगाला करमणार नाही..!

संततधार पाऊस होऊनही भक्तांवर कुठलाही परिणाम झाला नाही. आज पंढरपुरातील पांडुरंगालासुद्धा करमणार नाही, तेसुद्धा येथे आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महंत रामगिरी महाराजांनी व्यक्त केला.

10 हजार स्वयंसेवक

किर्तन सेवेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. त्यावेळी कोकमठाण सप्ताह समितीच्या 7, तर सराला बेट येथील 3 हजार असे एकूण 10 हजार स्वयंसेवक कार्यरत होते. त्यासाठी 300 ट्रॅक्टरच्या सहाय्याने काटेकोर नियोजन करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT