अहमदनगर

नगर : ‘बॅडपॅच’ उठलाय वाहन चालकांच्या मुळावर!

अमृता चौगुले

खेड, पुढारी वृत्तसेवा : अमरापूर-भिगवण राज्यमार्गावर खेड नजिक आखोणी हद्दीत कित्येेक महिन्यांपासून असलेला 'बॅडपॅच' निघणार कधी? असा सवाल नागरिक आणि वाहनचालक करीत आहेत.

कर्जत ते खेड या तीस किमी अंतरापर्यंत राज्यमार्गाचे काम पूर्ण होऊन वर्ष लोटले आहे. मात्र खेड नजिकच्या आखोणी येथे काही शेतकर्‍यांनी भू-संपादनाच्या मुद्यावरून काम थांबविले आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. सर्व अडचणी पार करत राज्यमार्ग पूर्ण झाला आहे. मात्र, केवळ एका बॅडपॅचमुळे वाहनांना ब्रेक मारावा लागत आहे. कित्येेक महिन्यांपासून रखडलेल्या या बॅडपॅचचा प्रश्न का सुटत नाही, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. मतदारसंघाला मिळालेले दोन-दोन आमदार नेमकं करतात काय? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

शहरातील इमारतींचा विकास, विविध स्पर्धा आणि तलाव भरून घेण्याची स्पर्धा, यामध्ये गुंतलेले कर्जतचे राजकारण पुढे सरकतच नसल्याने कर्जत शहरापासून दूर अंतरावर असलेली गावे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या हा राज्यमार्ग सुसाट बनला असला तरी काही ठिकाणी अनेक धोके निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता कमी जास्त उंचीचा झाल्याने समोरून आलेली वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांच्या मालिका सुरू आहेत. रस्त्याचा दर्जा आणि रस्त्याच्या ठेकेदाराबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधी तोंड उघडायला तयार नाहीत. किमान एकाच पंचवार्षिकमध्ये हा सर्व रस्ता नागरिकांच्या आणि वाहन चालकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांचे काय?

राज्यमार्गावरील खेडनजिक अंबेराई फाट्याजवळ पाईपलाईनसाठी नवीन झालेला राज्यमार्ग खोदण्यात आला होता. मात्र, अद्यापही हा रस्ता डांबराने दुरुस्त करण्यात आला नाही. या रस्ता खोदाईसाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का, परवानगी घेतली होती तर या खोदाई केलेल्या रस्त्याची दुरुस्ती का झाली नाही, यात अधिकारी-कर्मचार्‍यांनी मलई तर खाल्ली नाही ना, याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT