अहमदनगर

नगर : बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

अमृता चौगुले

धानोरे/ लोणी : पुढारी वृत्तसेवा : बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना राहाता तालुक्यातील पाथरे बु. येथे सीताराम भीमराज कडू यांच्या वस्तीवर घडल्याने खळबळ उडाली.

मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सीताराम कडू यांच्या घराजवळील गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून पाच शेळ्या ठार केल्या. हल्ल्यादरम्यान, गोठ्यातून शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून सीताराम कडू गोठ्याकडे गेले असता, त्यांना बिबट्यासह दोन बछडे दिसले. त्यांनी आरडाओरड करून शेजारच्यांना जागे करीत बिबट्याला हाकलले. तोपर्यंत बिबट्याने त्यांच्या पाच शेळ्या ठार केल्या होत्या. कडू यांनी याबाबत वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. म्हस्के यांनी कोपरगावच्या वनपरीक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील, वनपाल बी. एस. गाढे यांना ही माहिती दिली. वनरक्षक संजय साखरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

कडू कुटुंब शेतकरी आहे. त्यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसाय व शेळी पालनावर अवलंबून आहे. दरम्यान, वनविभागाने या भागात तत्काळ पिंजरा लावावा व कडू यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विष्णू कडू, रामराव कडू, अशोक कडू, रमेश कडू, भानुदास कडू, पोपट कडू, नीलेश ब्राह्मणे, प्रशांत कडू, पत्रकार अनिल वाघचौरे, विकास म्हस्के आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT