राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बारागाव नांदूर व इतर 15 गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सुरळीत झालेली पाणी योजना दोन दिवसांपासून बंद पडली आहे. देसवंडी व पिंप्री वळण परिसरात मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्याने पाणी योजना बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, लवकरच योजना सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हा परिषद माजी सदस्य धनराज गाडे यांनी सांगितले.
राज्याला आदर्शवत ठरणारी व कोटी रुपये ठेव असणारी बारागाव नांदूर व इतर 15 गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाईप लाईन लिकेज झाल्याने पाणी पुरवठा ठप्प झाल्याचे चित्र आहे. देसवंडी व पिंप्री वळण येथे लिकेज काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. योजना सुरू करण्यासाठी किती अवधी लागणार, हे दुरुस्तीमध्ये लक्षात येईल. जास्त प्रमाणात लिकेज असल्याने योजना सुरू करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारल्याचे मत योजनेचे सचिव बाळासाहेब गागरे यांनी व्यक्त केले. या योजनेवर बारागाव नांदूर, डिग्रस, रहाुरी खुर्द, तमनर आखाडा, देसवंडी, कोंढवड, शिलेगाव, केंदळ बु., केंदळ खुर्द, पिंप्री वळण, मांजरी आदी गावांचा समावेश आहे.
बारागाव नांदूर पाणी योजना सुरळीत करण्यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकार्यांसह कर्मचारी सर्वस्व प्रयत्न करीत आहे. मुख्य पाईप लाईन दुरुस्ती गरजेची आहे. लिकेज दुरुस्तीनंतर योजना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जि.प.सदस्य धनराज गाडे यांनी सांगितले.