अहमदनगर

नगर : बारागाव नांदूरकरांनी उधळविली ग्रामसभा!

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये 18 पैकी केवळ 3 ग्रामपंचायत सदस्य हजर असल्याचे पाहून, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळून लावली. सर्व ग्रामपंचायत सदस्य असल्याशिवाय ग्रामसभा होणार नाही, असा पावित्रा घेतल्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांनी आज दुसर्‍या दिवशी (दि.30) रोजी ग्रामसभा घेतली जाणार असल्याचे सांगितले.

सदस्यच उपस्थित नसल्याने गावकऱ्यांचा संताप

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत घेतली जाणारी ग्रामसभा गावात धार्मिक सप्ताह सुरू असल्याने काल (दि.29) रोजी सकाळी 10 वाजता ग्रामसभा घेण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला. यासाठी महसूल, पोलिस, वन, आरोग्य अशा सर्वच शासकीय विभागाला बोलविण्यात आले होते. शासकीय अधिकार्‍यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा सुरू झाली. ग्रामविकास अधिकारी पी.एस. गोसावी यांनी प्रास्तविक केले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सुरेखाताई देशमुख यांची निवड झाली. गावातील रस्ते, पाणी, वीज, अतिक्रमण यांसह विविध समस्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ग्रामसभा सुरळीत होणार असतानाच ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीवर चर्चा सुरू झाली. ग्रामसभेमध्ये पहाणी केली असता व्यासपिठावर सरपंच देशमुख, उपसरपंच अनिल गाडे व सदस्या बबईताई माळी हे तीघेच उपस्थित होते. बारागाव नांदूर ग्रामपंचायतीमध्ये 17 ग्रामपंचायत सदस्यांसह लोकनियुक्त सरपंच असे एकूण 18 जण पदाधिकारी आहेत. यापैकी केवळ तीघेच ग्रामसभेला आले. ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे. समस्या सोडविण्यासाठी सदस्यच ग्रामसभेला उपस्थित राहत नसल्यास ग्रामसभेला महत्व काय, अशी चर्चा सुरू झाली.

याबाबत नवाज देशमुख यांनी मुद्दा उपस्थित करीत ग्रामसेवक गोसावी यांनी विचारणा केली. शासकीय अधिकार्‍यांसह ग्रामस्थ उपस्थित असताना ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहत नाहीत, हा अपमान असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सर्वच ग्रामस्थांनी याप्रसंगी भावना व्यक्त करताना ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांच्या मूलभूत सोय सूविधांबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होणार असेल तरचं ग्रामसभा घ्या, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांनी ग्रामसभा उधळल्याचे पाहून ग्रामविकास अधिकारी गोसावींसह शासकीय अधिकारी व कर्मचारी गोंधळले.
बारागाव नांदूर परिसरामध्ये समस्या वाढल्या आहेत. पाणी पट्टीची थकबाकी, वाढते अतिक्रमण, विद्यार्थ्यांच्या समस्या, कचरा नियोजनासह गावातील रस्त्यावर पसरणारी दुर्गंधी, बिबट्यांचा वावर, आरोग्य समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी आदी महत्वाच्या मुद्यांवर ग्रामस्थांच्या तक्रारींचे निरसण होणार होते, परंतु ग्रामसभा उधळली गेली. ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सर्वच ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आज (दि. 30 ) रोजी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आज होणार्‍या ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पतीराज व्यवस्था नकोच..!

ग्रामसभेत काही ग्रामपंचायत सदस्यांचे पती उपस्थित होते. परंतु ग्रामस्थांनी जे सदस्य आहेत, तेच महत्वाचे आहेत, पतीराज ग्रामसभेत चालणार नाही. ज्यांना लोकांनी मते दिली त्यांनीच ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामसभेत उपस्थित करा, अशी जोरदार मागणी केली.

SCROLL FOR NEXT