अहमदनगर

नगर : बारा तासांत 9 आरोपी गजाआड

अमृता चौगुले

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील सेवा संस्थेच्या निवडणुकीतील वादातून झालेल्या अजय गोरक्ष पालवे (वय 22, रा. देवराई) याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बारा तासांच्या आत 9 आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींच्या वाहनाचा सिनस्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

देवराई सेवा संस्था निवडणुकीत श्री बालाजी शेतकरी विकास मंडळ विजयी झाले. तर, विरोधी अनिल पालवे यांच्या गटाचा पराभव झाला. विजयी पॅनलची शनिवारी (दि.18) सायंकाळी साडेसहा वाजता मिरवणूक सुरू असताना पराभूत झाल्याचे कारणांवरुन अनिल एकनाथ पालवे, सुनिल एकनाथ पालवे, ओमकार उर्फ ओम विष्णू बडे, आकाश सुनील पालवे, गणेश सुनील पालवे, पुष्पा सुनील पालवे, सविता अनिल पालवे यांच्यासह सोळा जणांनी(सर्व रा. देवराई, ता.पाथर्डी) यांनी तलवार, सुरा, कुर्‍हाड, लाकडी दांडा, काठ्यांनी हल्ला केला.

मनोहर नवनाथ पालवे यांच्यावर तलवारीने दोन्ही हातावर व कुर्‍हाडीने डोक्यात, विष्णू पालवे यांच्या डोक्यात, वैभव पालवे यांच्या डोक्यात, तलवारीने, सुरा, लोखंडी कुर्‍हाड, लाकडी दांड्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.अजय गोरक्ष पालवे यांच्यावर अनिल एकनाथ पालवे याने तलवारीने वार केले. अजय पालवे याचा नगरला उपचारासाठी घेवून जाताना त्यांचा मृत्यू झाला.

अन्य तीन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बाळासाहेब नवनाथ पालवे यांच्या फिर्यादीवरुन सोळा जणांविरुद्ध खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर जखमी करणे, शिवीगाळ, मारहाण व खुनाची धमकी देणे, शस्त्र अधिनियम 25,4, महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अनिल पालवे व त्याचे पाच साथीदार तिसगाववरुन फॉर्च्युनर गाडीतून पळून जात असताना, पाथर्डी गुप्त वार्ता विभागाचे पोलिस कर्मचारी भगवान सानप, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व त्यांचे सहकारी यांनीही मिरीकडे जाऊन पाठलाग सुरु केला. पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांनीही संशयितांचा पाठलाग सुरु केला.

पाथर्डी, सोनई, नेवासा येथील पोलिसांनी सुमारे दीड तास पाठलाग केला. पांढरीपुल, घोडेगाव व नेवासा फाटा, शेवगाव, कुकाणा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. सिनेस्टाईल पाठलागानंतर अखेर अनिल एकनाथ पालवे, संजय विष्णू कारखिले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अ‍ॅड. दिनकर सावळेराम पालवे यांना फॉच्युर्नर गाडीतून नेवासाफाटा येथे ताब्यात घेण्यात आले. तर, सुनील एकनाथ पालवे, संतोष रामदास पालवे, अंबादास सदाशिव पालवे यांना नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी पकडले. अक्षय संभाजी पालवे यांला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एकूण नऊ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य फरार संशयितांचा पोलिस शोध घेत आहे.

अजय पालवेवर अंत्यसंस्कार
करंजी : देवराई येथे सेवा संस्था निवडणुकीच्या कारणावरून झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या अजय पालवे यांच्यावर रविवारी (दि.19) दुपारी देवराईत तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्यासह काही राजकीय नेते उपस्थित होते. शनिवारी रात्रीपासूनच देवराईत पोलिसांची एक तुकडी ठाण मांडून आहे.

रास्तारोको प्रकरणी गुन्हे दाखल
देवराई येथे सोसायटी निवडणुकीच्या कारणावरून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ निषेधार्थ नगर-तिसगाव हा राष्ट्रीय महामार्ग अडवून देवराई बस स्थानक येथे रस्ता रोको करण्यात आला. या रास्तारोको प्रकरणी पोलिसांनी 23 लोकांसह अनोळखी 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.त्यामध्ये विष्णू कैलास पालवे, वैभव कैलास पालवे, कैलास किसन पालवे, पप्पू उर्फ राजेंद्र सर्जेराव पालवे, सर्जेराव किसन पालवे, ललित संभाजी पालवे, रामनाथ कारभारी पालवे, राजेंद्र दामोदर पालवे, अंकुश कारभारी पालवे, अक्षय बाळासाहेब पालवे, अविनाश हरिभाऊ पालवे, गोरक्ष भानुदास पालवे, रवींद्र भानुदास पालवे, संजीवनी गोरक्ष पालवे, संकेत अनिल पालवे, बबन बाबुराव पालवे, अनिल शिवनाथ पालवे, राधाबाई कैलास पालवे, भाऊसाहेब जयराम क्षेत्रे, नवनाथ ज्ञानदेव पालवे, अलका सतीश पालवे, सतीश माणिक पालवे, सोनू उर्फ संकेत अशोक पालवे व इतर अनोळखी 10 ते 15 जण (सर्व रा. देवराई ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुध्द पोलिस कर्मचारी सतीश खोमणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT